प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. ११ , केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात गेले वर्षभर आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मार्गावर खिळे ठोकण्यापासून ते आंदोलकांवर ऐन थंडीत गार पाण्याचे फवारे मारण्यापर्यन्त आणि आंदोलन स्थळाची वीज तोडण्यापासून त्यांच्यावर देशद्रोही अशी विकृत टीका करण्या पर्यंत अनेक प्रयत्न झाले. पण शेतकऱ्यांचे हे आंदोलन उधळून लावणे शक्य झाले नाही.या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी मध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा व ठार मारण्याचाप्रकार अतिशय अमानवी ,क्रूर ,निंदनीय ,घृणास्पद प्रकार आहे.अशा पद्धतीने आंदोलन चिरडणे हा लोकशाहीचा खून आहे.त्यात अपराधी असलेल्याना अटक तर झाली पाहिजेच.पण केंद्र सरकारने या कायद्यांवरील आक्षेपाना योग्य उत्तर ही दिले पाहिजे आणि समर्पक उत्तर नसेल तर हे कायदे मागे घेतले पाहिजेत असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. प्रसाद कुलकर्णी ' आंदोलनजीवी ते आंदोलकांचा जीव ' या विषयावर प्रथम मांडणी केली.त्यात शेती कायदे,केंद्र सरकारची धोरणे,शेतकरी आंदोलन, बंदचे हत्यार आदीबाबत विवेचन केले.
या चर्चेतून असे मत व्यक्त झाले की,सरकार लोकांच्या जगण्याच्या हक्काच्या रक्षणापासूनच बाजूला जात आहे.
शेती कायद्यापासून कामगारविषयक कायद्यापर्यंतचे सर्वसामान्यांचे नुकसान करणारे कायदे , पेट्रोलपासून खाद्यतेलापर्यन्त आणि गॅसपासून डाळीपर्यन्त सर्व वस्तूंची जीवघेणी वाढती महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था, सार्वजनिक उद्योगांची विक्री, लहानमोठ्या उद्योग धंद्यांची होत चाललेली मोडकळ, फसलेली नोटबंदी ,प्रचंड बेरोजगारी,सातत्याने घटणारा विकासदर ,घटनात्मक मूल्यांची सातत्याने चाललेली पायमल्ली,पी.एम.केअर फंडापासून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यापर्यंत पाळली जाणारी गुप्तता अशा अनेक प्रश्नांवर सरकार मूग गिळून गप्प आहे.
पण जनता हे सारे डोळ्यांत पहाते आहे व मनात साठवते आहे.लोकशाही व्यवस्थेत लोक योग्य संधीचा शोध घेत असतात.पण त्या संधीने जनतेचीच माती केली की जनता धडा शिकवल्याशिवाय रहात नाही.हा केवळ भारतीय नव्हे तर जगातीक राजकारणाचा इतिहास आहे.या चर्चेचा अभ्यासपूर्ण समारोप दयानंद लिपारे यांनी केला.यावेळी प्रा.रमेश लवटे,तुकाराम अपराध,अशोक केसरकर,अन्वर पटेल, पांडुरंग पिसे,राजन मुठाणे,मनोहर जोशी,सचिन पाटोळे,महालिंग कोळेकर,रामभाऊ ठिकणे,सागर माळी,अक्षय पोवार, शकील मुल्ला,श्रेयश लिपारे,ऍड.जयंत बलुगडे,शहाजी धस्ते,आनंद जाधव आदींनी सहभाग घेतला.