ते सहा तास ' मार्गावर येण्यासाठी उपयुक्त ठरोत



प्रेस मीडिया वृत्तसेवा -

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )


सोमवार ता. ४ ऑक्टोबर २०२१रात्री साडेनऊनंतर अचानक जगभरचे फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम बंद पडले.ते सहा तासांनी सुरू झाले.पण ते सहा तास जगभर एकच हाहाकार माजला. जगातील एक आघाडीचे सोशल नेटवर्किंग संकेत स्थळ काही तास बंद झाले तर काय होऊ शकते याचे दर्शन या काळात झाले. यांत्रिक बिघाडामुळे हे झाले असे फेसबुक सांगितले अर्थात ते न सांगताही कळले होतेच. फेसबुकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी या बिघाडामुळे उपभोगकर्त्याना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. ते म्हणाले ,'आपल्या आप्त स्वकियांशी संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात याची आम्हाला कल्पना आहे.  झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.' हे एक वाक्य  मार्क झुकेरबर्ग यांची व्यवसायिक प्राधान्यता अधोरेखित 

 करते. तसेच सध्याच्या टेक्नोसॅव्ही जमान्यात माणूस म्हणून आपले  संकेतस्थळावरील अवलंबित्व किती वाढले आहे हेही स्पष्टपणे दाखवते.

 खरे तर समाजमाध्यमांच्या या काही तासांच्या तांत्रिक अडथळ्यामुळे जणू काही आता सारं संपलं, श्वास कोंडला  गेला,जीवन मिळमिळीत झालं आहे असं वाटण हे  कितपत योग्य आहे ? याचा मानसशास्त्रीय भूमिकेतून विचार करण्याची गरज आहे. याचं कारण समाज माध्यमाने आपली विचार करण्याची शक्ती  मोठ्या प्रमाणात मारून टाकली आहे. या आभासी विश्वाचे बाजारीकरण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. हे माध्यम खोट्या अफवा पसरवण्यात आणि धादांत असत्य बिंबवण्यातअग्रक्रमावर राहिलेले आहे.लोकशाही व्यवस्थेत जनता ही सार्वभौम असते  हा संकेत झुकेरबर्गच्या या संकेतस्थळांनी अनेकदा झुगारून दिला आहे.हे माध्यम जनतेऐवजी आपल्या हातामध्ये निवडणुका घेऊ लागलेले  व निकाल देऊ लागलेले जगभर दिसू लागले आहे. अर्थात सर्वांना काही काळ ,काही जणांना सर्वकाळ थापा मारून फसवता येते. पण सर्वांना सर्वकाळ थापा मारून गप्प बसवता येत नाही. हेही इतिहासदत्त वास्तव आहे. त्यामुळे या माध्यमांच्याही मर्यादा उघड होणार आहेत ,होत आहेत.अनेक वाचाळवीरांनी  लाईक पेक्षा कैकपटीने डिसलाइक मिळवण्याच्या केलेल्या विक्रमातून ते दिसून आलेले आहेच.

या सहा तासाच्या संकेतस्थळी बंदने आपल्याला माणूस म्हणून आपल्याबाबत पुन्हा विचार करण्याची संधी दिली आहे .या सकारात्मकतेने याकडे पाहिले पाहिजे. आपण आपली विचारशक्ती या माध्यमांमुळे खुंटवून टाकली आहे का ? आपली मतं गहाण टाकली आहेत का ? आपली बुद्धी क्षीण करून घेतली आहे का? आपली जीवनपद्धती आपण बदलून टाकली आहे का ?याचे आपल्या सर्वांगीण आरोग्यावर  झालेले आक्रमण आपण दुर्लक्षित करीत आहोत का ? आपला प्रचंड वेळ ही माध्यमे गिळंकृत करत आहेत का ?

आपण सतत ऑनलाईन हाच आपला जिवंत असल्याचा अर्थात हयातीचा दाखला आहे का ? आपण ऑफलाईन असणं म्हणजे आपला मृत्यू दाखला असतो का ? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अर्थात समाज माध्यमांचे निश्चितपणे अनेक फायदे आहेत ते दुर्लक्षित करता येणार नाहीत.त्याची अपरिहार्यताही नाकारता येणार नाही. मुद्दा आहे तो आपल्या अपरिहार्यतेचा तो समजून घेणे महत्वाचे आहे.माणसांपासून दूर राहून माध्यमांशी जवळीक साधण्याचा प्रयत्नात आपण आपल्यापासून तुटत आहोत.याचा विचार करण्याची गरज आहे. दुनिया मेरी मुठ्ठी में म्हणत असताना आपण आपले स्वातंत्र्य गमावून या माध्यमाच्या विषारी विळख्यात अडकलो आहोत का ? हेही तपासले पाहिजे.

या माध्यमांवर माणूस म्हणून व्यक्त होण्याऐवजी सोय म्हणून व्यक्त होणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

सहा तास ही संकेतस्थळे बंद झाल्यामुळे त्याच्या मालकाला बावन्न हजार कोटी रुपयांचा फटका बसला असे जाहीर झाले. त्यावेळी ही माध्यमे वर्षानुवर्षे चोवीस तास सुरू आहेत. त्याचा किती फायदा मालकांना होत असेल हे आपण लक्षात घेतले पाहिजे. माध्यमांची अपरिहार्यता निर्विवादपणे आहे.पण त्याचा कसा व किती वापर करायचा हे आपल्या हातात आहे. त्याचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे. संकेतस्थळे बंद झाल्याने मालकाचा तोटा होत असेल तर ती सुरू असताना ग्राहकाच्या होणाऱ्या तोट्याचाही विचार केला पाहिजे. तो ग्राहकांनी व्यक्तिगत पातळीवर केला पाहिजे हा या यांत्रिक बिघाडाचा अन्वयार्थ आहे.ते सहा तास ' मार्गावर 'येण्यासाठी उपयुक्त ठरोत असे वाटते.



Post a Comment

Previous Post Next Post