गांधीजींचा जीवन शिक्षणाचा आग्रह महत्वाचा
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता. गांधीजींच्या शिक्षणविचारात सक्तीचे प्राथमिक शिक्षण,व्यावसायिक शिक्षणाचा आग्रह,मातृभाषेचा आग्रह,नैतिक विकास आणि जीवन शिक्षण याला महत्व आहे.जीवन शिक्षणाचा त्यांचा आग्रह फार महत्वाचा आहे. त्यांच्या शिक्षण, व्यापार, शेती, आरोग्य,धर्म,राजकारण आदी सर्व विचारात माणसाचा माणूस म्हणून विकास अभिप्रेत होता.आजच्या व्यवस्थेने सामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासाऐवजी मूठभर भांडवलदारांचे भले करण्याचा घाट घातला आहे.तो उघड करून गांधी विचारांशी बांधिलकी मानून कार्यरत राहणे हीच गांधीजीना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे तरुण शिक्षक अभ्यासक कार्यकर्ते सचिन पाटोळे यांनी व्यक्त केले.
ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ' गांधीविचार व आजचा संदर्भ ' या विषयावर बोलत होते.प्रारंभी प्रा.रमेश लवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमांना तुकाराम अपराध यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच ज्येष्ठ मराठी साहित्यिक द.मा.मिरासदार यांना आदरांजली वाहण्यात आली.
सचिन पाटोळे पुढे म्हणाले, आजच्या सर्वांगीण विषमतावादी आणि हिंसक वातावरणामध्ये अहिंसा विचारांची नितांत साऱ्या विश्वाला पटलेली आहे. गांधीजींचे व्यक्तिमत्व आणि विचार ही संपूर्ण मानव जातीला आदर्श ठरणारा आहे. म्हणूनच त्यांचे विचार कालातीत आहेत.त्याचा समकालीन संदर्भ मोठा आहे. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये सचिन पाटोळे यांनी या विषयाची विविध अंगाने मांडणी केली.तसेच श्रोत्यांच्या शंकांचे निरसनही केले.या वेळी प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर,प्रा.रमेश लवटे,दयानंद लिपारे,राजन मुठाणे,तुकाराम अपराध,पांडुरंग पिसे,महालिंग कोळेकर, देवदत्त कुंभार,रामभाऊ ठिकणे,सागर माळी,शकील मुल्ला,नौशाद शेडबाळे,अशोक माने,शहाजी घस्ते आदी उपस्थित होते.नौशाद शेडबाळे यांनी आभार मानले.