प्रेस मीडिया वृत्तसेवा :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा २ ऑक्टोबर हा जन्मदिन. या निमित्त या दोन्ही महामानवांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराचे विनम्र अभिवादन..!
आज या दोहोंच्या विचारांची कृतिशीलता अंगीकारण्याची मोठी गरज याचे. कारण हा देश शेतीप्रधान आहे व शेतकरीच साऱ्यांचा पोशिंदा आहे याचे महत्व जाणून " जय जवान जय किसान " हा राष्ट्रीय नारा शास्त्रीजींनी दिला.पण आज शेती व शेतकरी विरोधी कायदे केले जात आहेत.शेतकऱ्यांचा आवाज निर्लज्जपणे बेदखल केला जात आहे. शेती भांडवलदारांच्या दावणीला बांधली जात आहे. शेतकऱ्यांना देशद्रोही व इतर शिव्या हासडून नागवले जात आहे.
गांधीजींच्या बद्दलही मुखात गांधीजी आणि मनात नथुराम ही विकृती वाढत आहे. गांधीजींना सर्वसामान्यांच्या हृदयातून आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून काढता येत नाही.म्हणून त्यांचा संधीसाधू उदो उदो त्यांचे हितशत्रू करू लागले आहे. गांधीजींच्या साध्य-साधन विवेकाचे, अहिंसा विचाराचे किंवा एकूण गांधीवादाचे काहीही देणेघेणे या मंडळींना नाही. स्वातंत्र लढ्यात ज्यांचा सहभाग नव्हता असलाच तर तो इंग्रजांच्या बाजूने होता.ती मंडळी आज राष्ट्रपित्याचा वारसा सांगत आहेत.हे सारेच भयावह आहे. म्हणूनच गांधीजी आणि शास्त्रीजी यांना खरे अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे ,विचार वारसा जपणे व राष्ट्रीय धोरणात तो आणण्याचा आवाज बुलंद करणे गरजेचे आहे.
मला महात्मा गांधीजींच्या १२५ व १५० व्या जन्मदिनी ' महात्मा गांधी आणि गांधी वचने (१९९४) आणि 'राष्ट्पिता महात्मा गांधी (२०१९ ) ही दोन छोटेखानी पुस्तके लिहिता आली.आणि समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ती प्रकाशित झाली याचा मनस्वी अभिमान आहे. आज गांधीजींवर पूर्वीच लिहिलेली एक गझल.
राष्ट्रपिता
-------
स्वातंत्र्याची गाथा रचतो या देशाचा राष्ट्रपिता
युगनिर्माता म्हणून ठरतो या देशाचा राष्ट्रपिता..
चरख्यामागे चरखा होतच फिरत राहिला जीवनभर
चरख्यामधुनी हृदये विणतो या देशाचा राष्ट्रपिता...
भारत छोडो,करो या मरो ,क्रांतिदिनी आदेश दिला
लोकांच्या भाषेत बोलतो या देशाचा राष्ट्रपिता...
त्यांच्या हाती लाठ्या - गोळ्या याच्या हाती मीठ असे
साम्राज्याला धूळ चारतो या देशाचा राष्ट्रपिता..
भारत आणिक आफ्रिकेसह विश्वात वंदती त्याला
पिचलेल्यांची मने जाणतो या देशाचा राष्ट्रपिता..
पहिल्या वहिल्या स्वातंत्र्यदिनी जन सेवेतच रमणारा
सामान्यांचे अश्रू पुसतो या देशाचा राष्ट्रपिता..
अनुयायीही मिळत राहती याच कारणे युगेयुगे
प्रयोगातूनी सत्य सांगतो या देशाचा राष्ट्रपिता...
'मी सांगतो तेच खरे असे 'कधी न त्याने म्हटलेले
लोकमताचा आदर करतो या देशाचा राष्ट्रपिता..
पृथ्वीवरती जोवर मानव तोवर त्याची महतीही
मानवतेची ज्योत लावतो या देशाचा राष्ट्रपिता..
मनबदलाच्या विश्वासावर खुन्यांस माफी देणारा
विश्वामधला महान असतो,या देशाचा राष्ट्रपिता..
जाती धर्मा मध्ये इथली भ्याड पिलावळ गुरफटता
समतेसाठी रक्त सांडतो या देशाचा राष्ट्रपिता...
लाखोंचा सूट घालतो तो पक्का ठरला राष्ट्रविका
अन पंचाने देश बांधतो या देशाचा राष्ट्रपिता..
शूर अहिंसी योद्धा होता,विचार त्याचा अमरत्वी
गोळ्या घालून कुठे संपतो ? या देशाचा राष्ट्रपिता..
---प्रसाद माधव कुलकर्णी
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर
पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र )
( ९८ ५०८ ३० २९०)
Prasad.kulkarni65@gmail.com