प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई दि. 11 - साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. या प्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज तुचे दुःखद निधन झाल्याचे कळताच ना रामदास आठवले यांनी राजावाडी रुग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिष्ठाता डॉ विद्या ठाकूर यांची भेट घेतली.
तोपर्यंत पीडित महिलेचा पार्थिव देह जे जे रुग्णालय येथे शवविच्छेदन तपासणी साठी पाठविण्यात आला होता.त्यानंतर माध्यमांशी बोलताना ना रामदास आठवले यांनी याप्रकरणी जलद गती न्यायालयात खटला चालवून 6 महिन्यात आरोपीना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; डी एम चव्हाण आदी रिपाइं पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखवेत आणि साकिनाका येथे महिलेवर झालेला अमानुष अत्याचार बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या साकिनाका पोलीस ठाणे येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निषेध निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती ना रामदास आठवले यांनी दिली.
सदर पोडीत महिला जर दलित समाजाची असेल तर या प्रकरणी ऍट्रोसिटी ऍक्ट सुद्धा लावण्यात यावा. पीडित महिला कोणत्याही समाजाची असो ती महिला आहे तिला न्याय मिळाला पाहिजे. पीडित मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाने सांत्वनपर 10 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.