प्रेस मीडिया वृत्तसेवा :
उद्यानपंडित गणपतराव पाटील वाढदिवस: विशेष लेख
- संजय आप्पासाहेब सुतार, नांदणी.
मो. ८६००८५७२०७.
अवघे बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन, शेती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून एक प्रयोगशील, सजग आणि सृजनशील शेतकरी, सहकार चळवळ वाढीसाठी ग्राउंड लेव्हलवर काम करणारा कार्यकर्ता, राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारा, सर्वसामान्यांच्या सर्वांगीण हितासाठी झटणारा नेता, एका साखर कारखान्याचा चेअरमन आणि दत्त उद्योग समूहातील सर्व संस्थांना प्रगती पथावर नेणारा मार्गदर्शक, सेंद्रिय शेती आणि क्षारपड मुक्ती साठी प्रयत्न करणारा भगीरथ अशी अनेकविध कार्याची वाटचाल ही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला नवी उंची देणारी ठरली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेण्यात आलेला हा थोडासा आढावा...
गणपतराव पाटील यांचा जन्म १९४७ चा. समाजकारण, राजकारण याचबरोबर आर्थिक, सहकार, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करीत असताना स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील साहेबांना आपल्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे जास्त वेळ देता येत नव्हते. याची जाणीवही त्यांना होती. मुलगा गणपतराव पाटील यांच्या शिक्षण, व्यायाम आणि चौफेर प्रगती यामध्ये साहेबांचे बारीक लक्ष असायचे. गणपतराव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जयसिंगपूरला यशवंत विद्यालयात झाले. साहेबांना त्यांच्या शिक्षणाकडे फारसे लक्ष देता येत नव्हते म्हणून त्यांनी इचलकरंजी येथील गणपतराव यांच्या आत्याकडे पाचवी ते सातवी शिक्षणासाठी पाठवले. गणपतराव हे व्यायामाने चांगली शरीरयष्टी कमवावी, मेहनतीमध्ये कमी पडू नयेत आणि खेळामध्येही प्रगती साधावी असे त्यांना नेहमी वाटायचे. त्याचबरोबर त्यांची वैचारिकही जडणघडण व्हावी या उद्देशाने त्यांना उत्तूर येथे राष्ट्र सेवा दलाच्या शाळेत आठवी ते दहावी साठी पाठवले. गणपतराव हे आत्मनिर्भर, स्वावलंबी व्हावेत आणि जगातील घडामोडींचा अनुभव त्यांना यावा हा उद्देश साहेबांच्या डोळ्यासमोर होता. गणपतरावांना दहावी नंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला प्रवेश घेऊन दिला. यादरम्यान शेती क्षेत्रामध्ये प्रगती करीत असलेल्या इस्राईल, जपान, अमेरिका आदी देशांना साहेबांनी भेटी दिल्या. तेथील नव तंत्रज्ञानाने आणि कमी खर्चात केल्या जात असलेल्या शेतीच्या प्रयोगाच्या संदर्भात आणि शेती, औद्योगीकरणाच्या नवनव्या प्रयोगामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. अशाच पद्धतीची नवीन प्रयोगाची शेती आपण करावी, आपल्याकडेही व्हावी असा विचार करून त्यांच्या मनाने नवी उभारी घेतली. आणि या नव्या प्रयोगामध्ये आपण एक नवा वाटाड्या अर्थात शेतीतील एक 'कृषिरत्न' घडवावा अशी कल्पना त्यांना स्वस्थ बसू देईना. याचा परिणाम म्हणूनच साहेबांनी गणपतराव यांना अचानक एके दिवशी घरी बोलावून सांगितले, 'आपल्याला काही नोकरी करायची नाही. त्यामुळे तुझे बारावीपर्यंत शिक्षण आता पुरे झाले. तू शेतीत काही प्रयोग करावेत असे मला वाटते. पण या माझ्या निर्णयाबाबत तुझ्यावर कोणतीही सक्ती मी करणार नाही.' साहेबांच्या या एका बोलण्यावर गणपतरावांनीही लगेच होकार दर्शविला आणि साहेबांच्या विचाराप्रमाणे चालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयानंतर गणपतराव पाटील यांनी स्वतःच्या पाच एकर शेत जमिनीमध्ये राबून विविध प्रयोगांना सुरुवात केली. या कालावधीमध्ये साहेबांनी त्यांना देशाच्या विविध भागात घेऊन जाऊन अनेक कृषी विद्यापीठे, शेती संशोधन केंद्र आणि अनेक ठिकाणी शेतीतील होणारे वेगवेगळे प्रयोग यांची माहिती होण्यासाठी स्वतः बरोबर घेऊन जाऊ लागले आणि सगळ्या गोष्टी दाखवत राहिले. हाती संपत्ती, पद, प्रतिष्ठा या सर्व गोष्टी असतानाही आणि आपल्या मुलाची शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होत असतानाही, त्याला शेतकरी बनवण्याचा निर्णय घेऊन साहेबांनी समाजासमोर फार मोठा आदर्श ठेवला. माझा मुलगा देशातील सर्वोत्कृष्ट शेतकरी व्हावा, त्याची शेती पाहण्यासाठी देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक यावेत हे स्वप्न पाहणारे साहेब निश्चितच लोकांना वेडे वाटतील पण त्या स्वप्नामागे किती मोठा विचार होता हे दिसून येते. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकीलचा मुलगा वकील आणि राजकारण्याचा मुलगा राजकारणी व्हावा अशीच काहीशी समाजामध्ये वस्तुस्थिती असताना मुलाला शेतकरी करण्याचा निर्णय, तोही देशातील सर्वोत्कृष्ट शेतकरी व्हावा ही महत्वाकांक्षा आज सत्यात पाहताना बरे वाटते, पण हा निर्णय घेणे सोपे नव्हते. शेतकरी या शब्दाला नवी उंची देण्याचे आणि वडिलांच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्याचे काम गणपतराव यांनी करून दाखवून वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याला नवा आयाम मिळवून दिला. मुलाचे जीवन ठरवून घडविणारा शिल्पकार वडील आणि आधारवड बनून केलेले मार्गदर्शन समाजातील बाप-लेकांना निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. बारावी नंतर शिक्षण थांबविण्याच्या निर्णयाला गणपतराव यांनीही स्वीकारले आणि साहेबांच्या निर्णयामागे कोणते तरी मोठे स्वप्न असेल आणि त्या स्वप्नाला आपण पूर्ण केले पाहिजे ही आत्मचिंतनातून भूमिका घेऊन त्यांनीही शेतीला आणि शेतकऱ्यांना एक नवी प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले. गणपतराव यांना ' उद्यानपंडित' म्हणून मिळालेला सन्मान हा त्यांच्या अथक परिश्रम आणि कामाची पोहोच पावतीच आहे. गणपतराव यांचे शेती आणि शेतीतील अनेक प्रयोगांचे हे काम आजही अखंडितपणे सुरू आहे. यामागे साहेबांची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाहिलेले उत्तुंग मोठे स्वप्न कारणीभूत आहे हे नक्की.
१९७१ ला शेती मध्ये पहिले पाऊल टाकताना त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग करून यशस्वी केली. त्यानंतर हे क्षेत्र वाढवत सहा ते सात एकर केले आणि चांगले उत्पादनही घेतले. शिरोळ तालुक्यातील काही युवा शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकरी मंडळ स्थापन केले. भाजीपाला, फलोत्पादन, फुलोत्पादन, ऊस शेती, केळी अशा विविध गोष्टींची चर्चा करून आधुनिक शेती करण्याकडे जातीने लक्ष दिले. यामुळेच शिरोळ तालुक्यात एका चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांची फळी निर्माण झाली. गणपतराव पाटील हे कायमच केंद्रस्थानी राहिल्याने त्यांना राज्य द्राक्ष बागायतदार संघाचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एका एकरात ८० टन टोमॅटो काढण्याचा विक्रम त्यांनी त्या काळी केला होता. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनी लीजवर घेऊन ५० ते ६० एकर जमीन गणपतरावदादा करु लागले. विविध व्हरायटीची द्राक्षे त्यांनी २८ एकरावर घेतली. द्राक्ष, नारळ, आंबा, चिकू, डाळिंब, बोरीच्या शेतीचे प्रयोग ते नेहमी करत राहिले. सन १९९८ मध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित ग्रीन हाऊसची उभारणी करून फुल शेतीचा प्रारंभ केला. यामध्ये ३० प्रकारच्या डच व्हरायटीच्या निर्यातक्षम गुलाबाचे उत्पादन घेतले. देशातील सर्वाधिक फुल उत्पादनाचा प्रकल्प म्हणून श्रीवर्धन बायोटेक प्रकल्प साहेबांच्या मदतीने आकाराला आणला. 'श्रीवर्धन रोज' या नावाने नवीन गुलाबाची निर्मिती केली. तसेच विविध प्रकारच्या गुलाबांच्या जाती विकसित केल्या.संगणक तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक टेक्नॉंलॉजीद्वारे ठिबक सिंचन व औषध फवारणीचा अवलंब करत संपूर्ण शेती साठी योगदान दिले. दत्त सोया प्रकल्प म्हणून सोयाबीनचा वेगळा प्रकल्पही त्यांनी राबविला. दादांचे फलोत्पादनातील विविध प्रयोग यशस्वी झाले होते. त्यातून दादा हॉलंड, इस्राईलमधील फुलशेतीचे प्रयोगही पाहून आले. हॉलंडमधील जगातील सर्वात मोठ्या फूल बाजाराला भेट देऊन माहिती घेतली. कॅलिफोर्निया येथे १५ दिवसाचा अभ्यास दौरा, इस्रायल येथे ७ दिवसांचा दौरा, दुबई येथील फळ मार्केटला भेट तसेच हॉलंड येथील जागतिक पुष्प प्रदर्शनास भेट व पाहणी करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी शेतीमध्ये केला. मातीऐवजी कुंड्यांमध्ये कोकोपीट भरून त्यात फुलांची झाडे लावून फुल उत्पादन करण्याचा नवा प्रयोग त्यांनी देशात प्रथमच यशस्वी केला. मातीविना शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हरितगृहामध्ये रंगीत ढोबळी मिरची, विलायती भाजीपाला, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, अंथुरियम असे अनेक प्रयोग केले. आज १०५ एकरात शेतीचे प्रयोग सुरू आहेत. एका एकरामध्ये ६४ टन उच्चांकी रंगीत ढब्बू मिरचीचे उत्पादन तसेच एका एकरामध्ये १४४ मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेण्याची कामगिरीही दादांनी केली आहे. त्यांचे शेतीतील असे अनेक प्रयोग थक्क करणारे आहेत.
अनेक नामांकित आणि विविध प्रकारच्या संस्थांवर त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. वीरशैव बँकेचे संचालक ते चेअरमन, शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक, जयसिंगपुर उदगाव बँकेचे संचालक, जांभळी टाकवडे पंचगंगा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संचालक व चेअरमन, जांभळी हायस्कूल व उदगाव हायस्कूलचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेचे माजी संचालक, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड नवी दिल्ली संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच राष्ट्र सेवा दल, साधना ट्रस्ट, वनराई ट्रस्ट, एस. एम. जोशी फौंडेशन, नवभारत शिक्षण मंडळ सांगली, आंतरभारती शिक्षण मंडळ उत्तूर, लोकसेवा विश्वस्त निधी सांगली अशा विविध संस्थांवर ते विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. जांभळी क्रीडा मंडळाचे ते आजीव अध्यक्ष आहेत. तसेच दत्त उद्योग समूहातील सर्व संस्थांचे काम ते जातीने लक्ष घालून संस्थांची प्रगती साधत आहेत.
२००१ ते २००४ या कालावधीत त्यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले. त्यानंतर २०१४ पासून आजतागायत ते कारखान्याचे चेअरमन म्हणून यशस्वीरित्या काम पाहत आहेत. स्व. सा. रे. पाटील साहेबांनी कारखान्याचा चेअरमन केलेली कामगिरी तसेच त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा अखंडितपणे पुढे चालविण्याचा प्रयत्न दादा करीत आहेत. आज साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत केली आहे. शेतकरी आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. कारखान्याच्या माध्यमातून १५० ते २०० टन ऊस उत्पादनाचे अभियान गतिमान करण्यात आले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी नवनवे तंत्रज्ञान आणि त्याची माहिती देण्यासाठी अनेक गावात शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे आणि मेळावे घेतले जात आहेत. बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगार मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जात आहेत. रक्तदान शिबीर, कबड्डी स्पर्धा, विविध कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, शेतकऱ्यांसाठी तसेच युवक-युवतींसाठी ऑनलाईन मार्गदर्शन, कोरोना महामारी काळात कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. गरीब गरजू रुग्णांना अत्यावश्यक सेवा इथे पुरवण्यात येतात.
दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कमी खर्चाच्या शाश्वत ऊस उत्पादन वाढ कार्यक्रमांतर्गत नामांकित शास्त्रज्ञ आणि शेती तज्ज्ञांचे चर्चासत्र कारखाना कार्यस्थळावर आयोजित केले होते. पूर परिस्थितीत आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान कसे टाळता येईल आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने कोणते पीक घेता येईल, आधी विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. शेतकऱ्यांना नवा दिलासा देण्याचा प्रयत्न आगामी काळात केला जाणार आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी शेतकऱ्यांना कारखान्याच्याकडून मदत केली जाते. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. सेंद्रिय साखर आणि गूळ तसेच सेंद्रिय शेती उत्पादनाची बाजारपेठ दत्त कारखान्यावर सुरू करण्यात आली आहे. दत्त भांडारने ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून आपुलकीची सेवा देत आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये सुमारे २५ हजार एकर जमीन क्षारपड बनली आहे. गेल्या ३०-४० वर्षांमध्ये पाण्याचा अतिवापर आणि रासायनिक खतांचा भडीमार यामुळे ही जमीन पाणथळ आणि क्षारपडीमुळे नापीक बनली. त्यामुळे अशा जमीनमालक शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला. उत्पादन काहीच येत नसल्याने आपल्या शेताची हद्द (शिव) कोठे आहे? याचाही त्यांना विसर पडला. ३०-४० वर्षात बेल्लारी, काटेरी झुडपे, बाबळीची झाडे यांनी व्यापलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नुसत्याच सातबारा नावावर होत्या. शेतकऱ्यांची एक पिढीच यामध्ये संपून गेली. शेतमजुरीची वेळ त्यांच्यावर आली.
क्षारपड जमीन पुन्हा ओलिताखाली आणण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यान पंडीत गणपतराव पाटील यांनी २०१७ पासून "क्षारमुक्त जमीन" ही महत्त्वाकांक्षी योजना आखली. आज श्री दत्त कारखाना आणि स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेच्या मोठ्या पाठबळामुळे शिरोळ तालुक्यातील ८००० एकराहून अधिक क्षेत्र क्षारपड मुक्त बनण्याच्या मार्गावर आहे. ५००० एकराहून अधिक क्षेत्र प्रत्यक्षात ओलिताखाली आले आहे. यामुळे क्षारपड जमीन मालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून नवचैतन्य, नवी उर्मी आणि त्यांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे, होत आहे. उद्यानपंडीत गणपतराव पाटील, श्री दत्त उद्योग समूह आणि जयसिंगपूर-उदगाव बँकेच्या या अलौकिक कार्याला सलाम करावासा वाटतो.
तालुक्यातील क्षारपड जमीन सुपीक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प त्यांनी करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. शेती तज्ञांशी तसेच शेतकऱ्यांही त्यांनी चर्चा केली. वस्तुस्थिती जाणून घेतली आणि काय करता येईल याचा सर्वांगाने अभ्यास केला.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करून गावातील नापीक जमीन सुपीक करण्याकरिता एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन गणपतराव पाटील यांनी केले. या आवाहनाला शेतकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. जमिनी क्षारमुक्त होण्याकरिता प्रथमच कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणाली व बंदिस्त मुख्य पाईपलाईन या तंत्राचा वापर करून बुबनाळ येथील ६० हेक्टर क्षेत्रावर क्षारमुक्तीचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्षारमुक्त प्रकल्पासाठी हेक्टरी सरासरी अडीच लाख रुपये (एकरी १लाख) इतका खर्च अपेक्षित होता. त्यासाठी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्याचे ठरले. बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा तसेच कर्जफेडीसाठी पहिले दोन वर्षे व्याज आणि नंतरच्या पाच वर्षात व्याज अधिक कर्ज रक्कम भरण्याची मुदत असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या विश्वासामुळे त्यांच्यात कर्ज फेडण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला. गणपतराव पाटील यांनी घेतलेला पुढाकार आणि बँकेच्या मोठ्या आर्थिक पाठबळामुळे या प्रकल्पाने गती घेतली. बुबनाळ गावातील ८० शेतकऱ्यांची ६० हेक्टर जमीन क्षारमुक्त झाली. या जमिनीत उसाबरोबरच अनेक नगदी पिकेही जोमाने उभी राहिली. या प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे व दरम्यानच्या काळात गणपतराव पाटील यांनी सातत्याने क्षारमुक्त प्रकल्पाच्या संदर्भात घडवून आणलेल्या शेती तज्ञ व शेतकऱ्यांच्या चर्चांमुळे शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन होत गेले आणि या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू लागला.
श्री दत्त कारखान्याच्या वतीने शिरोळ आणि परिसरातील १८ गावामध्ये क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे काम सुरू आहे. शिरोळ, घालवाड, गणेशवाडी, शेडशाळ, आलास, बुबनाळ, कुटवाड, हेरवाड, हसूर, राजापूर, कवठेसार, टाकवडे, अब्दुल लाट, मंगावती, जुगूळ, कागवाड आदी ठिकाणी सुरू आहे.
या गावाबरोबरच अनेक ठिकाणी क्षारपड मुक्तीचा हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होत आहे. यासंदर्भात सर्व्हे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात होत आहे. क्षारपड मुक्तीच्या या कामाचा आवाका पाहिल्यास आगामी काही वर्षात संपूर्ण शिरोळ तालुका क्षारपड मुक्त तालुका म्हणून ओळखला जाईल याची खात्री आहे. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कोणताही गाजावाजा न करता क्षारपड मुक्तीचा हा प्रकल्प यशस्वी होण्याकडेच संपूर्ण लक्ष दिल्याचे दिसून येते. आपला शेतकरी टिकला पाहिजे आणि त्याला टिकविला पाहिजे, त्याला पुन्हा त्याच्या पायावर उभा राहता आले पाहिजे, ही उदात्त भावना घेऊन ते काम करीत आहेत. रोज अनेक शेतकरी गणपतराव पाटील यांना भेटतात आणि आपल्या शेतामध्येही क्षारपड मुक्तीचा प्रकल्प राबवण्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतात. यावर ते मार्गदर्शन करतात आणि थोड्याच दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. ही खूपच दिलासादायक गोष्ट आहे. गणपतराव पाटील म्हणजे "क्षारपडमुक्त जमिनीचा ध्यास घेतलेले आधुनिक भगीरथ" वाटतात.
या प्रकल्पास शैक्षणिक, संशोधन, प्रशासकीय व विधायक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी भेट दिली आहे. या कामाचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दौलत देसाई आदींनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कौतुकाची थाप दिली आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी बेंगलोर येथे गणपतराव पाटील यांना निमंत्रित करून त्यांची आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन क्षारपड जमीन योजनेसंबंधी सविस्तर माहिती घेतली. कर्नाटक राज्याबरोबरच देशातील १० राज्यात क्षारपड जमीन सुधारण्याचा श्री दत्त साखर कारखान्याच्या पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. साहजिकच दत्त कारखान्याचे हे कार्य देशपातळीवर गेले आहे. याचे श्रेय नक्कीच गणपतराव पाटील दादा यांना जाते.
आगामी काळात शेतकऱ्यांची क्षारपड जमीन क्षारपडमुक्त होऊन पुन्हा एकदा सुजलाम -सुफलाम होईल आणि पूर्वीची समृद्धी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात नांदेल असा आशावाद बाळगण्यास काहीच हरकत नाही.
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना आतापर्यंत अतिशय प्रतिष्ठेचे २० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. तसेच दत्त सहकारी साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास, आर्थिक व्यवस्थापन अशा विविध पातळीवर देश आणि राज्यस्तरावरील ६५ पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार पाहता श्री दत्त साखर कारखाना, श्री दत्त उद्योग समूह आणि उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांचे झालेले कार्य निश्चितच सर्वांना अभिमानास्पद आहे असे वाटते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सदिच्छा!