सर्व विषयांना सभासदांनी दिली एकमताने मंजुरी.....
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/प्रतिनिधी:
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ५२ वी वार्षिक साधारण सभा व चॅरिटेबल ट्रस्टची १४ वी वार्षिक साधारण सभा आज ऑनलाईन माध्यमातून उत्साहात पार पडली. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
यावेळी बोलताना चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याच्या धोरणाप्रमाणे कारखान्याकडील नोंद असलेला पूर बाधित क्षेत्रातील ऊस गाळपास अग्रक्रमाने आणून शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणार आहोत. पुरामुळे कारखान्याकडे वार्षिक सरासरी क्षमतेपेक्षा कमी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने सभासदांनी पिकविलेला व कारखान्याकडे नोंदवलेला सर्व ऊस कारखान्यांस गळीतास घालावे. साखर उद्योग अतिशय बिकट अशा आर्थिक संकटातून जात असतानाही कारखान्याने अतिशय शिस्तबद्ध रित्या आर्थिक नियोजन केल्याने आज रोजी शासकीय वित्तीय संस्था, ऊस पुरवठादार, कामगार, ऊस तोडणी वाहतूक किंवा मक्तेदार यांच्यापैकी कोणाचेही देणे थकीत नाही. या आर्थिक वर्षामध्ये स्थावर मालमत्तेवरील घसारा इतर आवश्यक त्या तरतुदी केल्यानंतर २ कोटी १७ लाख ७९ हजारांचा निव्वळ नफा झाला आहे. येणाऱ्या हंगामाच्या सुरुवातीस कच्ची साखर उत्पादित करून निर्यात करण्याचे धोरण निश्चित केले असून त्यास सभासदांची मान्यता असावी. केंद्र शासनाने साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ३६०० रुपये इतकी जाहीर करावी अशी या सभेच्या माध्यमातून मध्यवर्ती शासनाकडे आपण मागणी करीत आहोत. या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर बीट पीक घेऊन सदरच्या बीट उत्पादनाचे गाळप कारखान्याच्या येणार्या गळीत हंगामात करावयाचे ठरले आहे. तसेच पुराच्या काळात तग धरून राहील अशा उसाच्या वाणाबद्दलही विद्यापीठ व संशोधन केंद्राबरोबर चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान व्हावे हा यामागचा हेतू आहे. कार्यक्षेत्रातील १८ गावामध्ये क्षारपड जमीन सुधारणा योजनेचे काम सुरू असून याद्वारे ६६९० एकर जमीन क्षारमुक्त होणार आहे. या प्रकल्पांतर्गत १५२ किलोमीटर मुख्य बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे व १८२५ एकर इतक्या जमिनीमध्ये कृत्रिम सच्छिद्र निचरा प्रणालीचे काम पूर्णत्वास आणून सदर जमिनी पिकाऊ झाल्या आहेत. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवूनच संस्थेचा कारभार करू, अशी ग्वाही गणपतराव पाटील यांनी यावेळी दिली. देशभरातील सहकारी साखर कारखानदारीमध्ये एक आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून कारखान्याचा नावलौकिक असून देश व राज्य पातळीवरील एकूण ६६ पुरस्कारही मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी बुवाफन महाराज क्षारपड जमीन सुधारणा व पूरक व्यवसायिक संस्था शिरोळच्या सभासदांनी गणपतराव पाटील यांचा 'क्षारपड मुक्तीचे जनक' म्हणून सत्कार केला.
प्रारंभी स्वागत कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले. त्यानंतर श्रद्धांजली यादीचे वाचनही गणपतराव पाटील यांनी केले. वार्षिक साधारण सभेच्या नोटीसीचे वाचन व १ ते ११ विषय मंजुरीसाठी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी सादर केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. आयत्या वेळचे विषय व सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे कार्यकारी संचालक पाटील यांनी दिली.
श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट च्या १४ व्या वार्षिक साधारण सभेच्या नोटीसीचे वाचन व १ ते ७ विषय मंजुरीसाठी एक्स ऑफिशियो ट्रस्टी एम. व्ही. पाटील यांनी सभेपुढे ठेवले. सर्व सभासदांनी या सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. शेवटी आभार चेअरमन गणपतराव पाटील यांनी मानले. यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आगर सरपंच अमोल चव्हाण, ऍड. शिवाजीराव चव्हाण, सी. ए. ऋषिकेश शिंदे, जेष्ठ नेते आण्णासाहेब पाटील, सर्व संचालक, संचालिका, शेतकरी सभासद उपस्थित होते.
या ऑनलाईन सभेसाठी एकूण २० सेंटरच्या ठिकाणी सभासदांना उपस्थित राहण्याची सोय करण्यात आली होती.