युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे .... - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ तळगाळातील सर्व तरुण पिढीला मिळवून द्यावा व युवा पिढीला आत्मनिर्भर करुन आत्मनिर्भर भारत करण्यासाठी सर्वांनी महत्वपुर्ण योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. 

दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्त भागातील कुटुंबातील एक हजार मुलींना 50 हजार रुपयांच्या मुदत ठेव प्रमाणपत्र वितरण सोहळा दिपलक्ष्मी मंगल कार्यालय, कवठेपिराण रोड, कसबे डिग्रज येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, जलसंपदा मंत्री तथा  सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशिल माने, आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष दौलत शितोळे, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, ट्रस्टच्या अध्यक्षा दिपाली  सय्यद-भोसले, अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, प्रातांधिकारी डॉ. संपत खिलारी, रुपाली चाकणकर नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, संजय बाजाज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आपत्तीच्या काळात निसर्ग सर्वांचीच पररीक्षा घेत असतो, या काळात सर्वांनी धैर्याने राहुन एकमेकाला मदतीचा हात दिला पाहिजे. भारतात सामाजिक कार्याची परंपरा खुप प्राचिन आहे. सन्मामार्गावर चालणारे लोक, परोपकराची ही परंपरा अखंडपणे चालवत आहेत. याच परंपरेशी नाते सांगणारे दिपाली सय्यद भोसले यांचे कार्य असून त्यांच्या ट्रस्टमार्फत होत असलेले कार्य खुप पुण्याचे आहे. आपत्तीग्रस्त भागाला मदत करण्याची त्यांच्यातील उर्जा प्रशंसनीय आहे. आपल्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीचा उपयोग सर्वांनीच चांगल्या कामासाठी करावा, असे सांगून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिपाली सय्यद- भोसले यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरही व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना शुभाशिर्वाद दिले. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात कन्या सहाय्य ठेव प्रमाणपत्राचे वितरण केले. 

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले, पैशांचा योग्य वापर करुन माणसांवर प्रेम करण्याचे दिपाली सय्यद-भोसले यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांचा हा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे जाणारा आहे. या कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील ड-1 ची यादी प्रसिध्द करण्यामध्ये लक्ष घालण्याची व आपत्तीग्रस्तांसाठी एन.डी.आर.एफच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगितले. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागातील कुटुंबांना दिलासा देण्याचे दिपाली सय्यद-भोसले चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे. पुरानंतर अनेकांचे संसार उध्वस्त होत असतात, जीवन अडचणीत येते. या भागाने आतापर्यंत 3 ते 4 वेळा असे प्रसंग अनुभवले आहेत. दिपाली सय्यद- भोसले यांनी ही परिस्थिती लक्षात घेवून अशा आपत्तीग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारी असल्याचे सांगितले. सांगली जिल्ह्यात वारंवार उद्भवणाऱ्या पूर स्थितीची राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना माहिती देऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी महापुराच्या स्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजनांसाठी जलसंपदा विभाग कार्यरत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी किल्ले मच्छिद्रनाथ पर्यटनासाठी विकसित करण्यात येत असून या ठिकाणाला राज्यपाल महोदयांनी भेट द्यावी अशी विनंतीही त्यांनी केले. 

यावेळी खासदार संजय पाटील व खासदार धैर्यशिल माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिपाली सय्यद- भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांच्या ट्रस्टमार्फत करण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रात केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, माजी विद्यानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चित्रफित संदेशाद्वारे आपल्या शुभेच्छा दिल्या. 


Post a Comment

Previous Post Next Post