बाप्पांच्या विसर्जनसाठी तब्बल 7 हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त असेल..पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 पुणे - 'करोनाच्या परिस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांना सहकार्य करून उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला आहे. त्याच प्रमाणे गणेश विसर्जनासाठी  मंडळांसह नागरिकांनी शासनाच्या नियमावलीचे पालक करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.बाप्पांच्या विसर्जनसाठी तब्बल 7 हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त असेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सार्वजनिक मंडळांनी मंडपातच बाप्पांचे विसर्जन करावे. घरगुती गणपती विसर्जनासाठी महापालिकेचे फिरते हौद, सोसायटीच्या आवारात सुविधा करावी. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष काळजीही घेतली जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

असा आहे बंदोबस्त

होमगार्ड-450, एसआरपीएफ-4 तुकड्या, दंगल विरोधी 10 पथके, बॉम्ब शोधक व नाशक 8 पथके, शीघ्र कृतिदल 16 पथके, सर्व पोलीस ठाण्यातंर्गत 1 हजार 100 कर्मचारी, गुन्हे शाखेतील 200 कर्मचारी, विशेष शाखेतील 100 कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्स 10 पथके, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेची 20 पथके, विशेष पोलीस अधिकारी एसपीओ 1,200.

विसर्जनाच्या दिवशी स्थानिक पोलीस ठाण्यांसह विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) गुन्हे शाखेचाही वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक झोननुसार बंदोबस्ताची तयारी केली आहेत. घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचाही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे.

- डॉ. रवींद्र शिसवे,
सहपोलीस आयुक्‍त

नियोजनासाठी लागणार पालिकेचा कस

यंदा शहरात गणेश विसर्जनासाठी कोठेही स्थिर हौद, विसर्जन घाट, कालव्याच्या ठिकाणी सुविधा नसेल. त्यामुळे महापालिकेचे फिरते विसर्जन हौद, तसेच नगरसेवकांकडून उपलब्ध होणाऱ्या हौदांवरच गणेशमूर्ती विसर्जन करावे लागणार आहे.

पालिकेने शहरात 283 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्राची सुविधा उपलब्ध केली आहे. या विसर्जन झालेल्या तसेच संकलित होणाऱ्या सर्व मूर्तींचे शास्त्रोक्‍त पद्धतीने विसर्जन करण्यासाठी पालिकेने वाघोली येथे दगडखाणीत सुविधा निर्माण केली आहे. नदी घाटांवर संबंधित क्षेत्रीय कार्यालय हद्दीत असलेल्या फिरत्या विसर्जन हौदांच्या ठिकाणाची माहिती, हौद उपलब्ध होण्याची वेळ दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. त्यावर, सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांकही दिलेले आहेत.

सकाळी 6 पासूनच फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध असेल. त्यात महापालिकेचे 60, नगरसेवकांनी उपलब्ध केलेले 58 तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी सुमारे 72 फिरते हौद उपलब्ध करून दिले आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post