प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख:
पुणे : लष्कर परिसरात विविध ठिकाणी विना व्यापार परवाना सुरू असलेली तब्बल 43 दुकाने, हॉटेल्स ही बोर्डाच्या रडारवर आहेत. यामध्ये एमजी रस्ता, ताबूत स्ट्रीट, साचापीर स्ट्रीट, स्यानगॉज स्ट्रीट, बुटी स्ट्रीट, मोलेदिना रस्ता आणि ईस्ट स्ट्रीट या भागांवरील लोकप्रिय हॉटेल्सचा समावेश आहे.
पुणे – लष्कर परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या व्यापारी प्रतिष्ठानांवर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने कारवाई सुरू केली असून, कारवाईच्या पहिल्याच दिवशी बोर्डातर्फे दोन दुकाने सील करण्यात आली. तर, 698 दुकानांवर अद्यापही कारवाईची टांगती तलवार आहे. त्याचवेळी कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी 24 व्यावसायिकांनी व्यापार परवानासाठी अर्ज दाखल केले आहेत.
बोर्डाने शुक्रवारी दिल्ली दरबार आणि सुजाता मस्तानी या दोन्ही दुकानांवर कारवाई करत, ही दुकाने सील केली. अद्यापही 698 दुकानांवर कारवाईची टांगती तलवार आहे. लष्कर परिसरात बाजारपेठांमध्ये आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दुकानांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता.
त्याचबरोबर बोर्डाच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता. या पार्श्वभूमीवर बोर्डातर्फे लष्कर परिसरात बोर्डाकडून व्यापार परवाना न घेता सुरू असलेल्या तब्बल 700 दुकानांची यादी तयार करण्यात आली होती. या सर्व व्यावसायिकांना बोर्डाकडून व्यापार परवाना घेण्याबाबत नोटीसदेखील बजावण्यात आली होती. मात्र, दोनवेळा मुदत देऊनही अनेक व्यावसायिक याबाबत टाळाटाळ करत होते. ही बाब लक्षात घेत बोर्डातर्फे 17 सप्टेंबरपासून विनापरवाना सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई सुरू करण्यात आली.
“कारवाईच्या पहिल्याच दिवशी दोन दुकाने सील करत त्यांच्याकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. यापुढेही पोलिसांच्या सुरक्षेमध्ये दहा दिवस ही कारवाई केली जाणार आहे,’ असे बोर्डाचे अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख आर. टी. शेख यांनी सांगितले.