प्रेस मीडिया वृत्तसेवा : प्रतिनिधी :
पुणे - 'पुण्याची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर म्हणून होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत.पुणे शहरालगतचे रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल,' असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम थिएटर उड्डाणपुलाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेविका मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, नगरसेवक श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, 'सिंहगड रोड उड्डाणपुलामुळे वाहतूक समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. या पुलावर 'डबलडेकर' सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे-मुंबईसह राज्याला केंद्र सरकारकडून जेवढी मदत देता येईल, तेवढी दिली जाईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू आहे, ही चांगली बाब आहे. नदी सुधार, रोप-वे व अन्य विकास प्रकल्पांसाठी सहकार्य केले जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. यावेळी त्यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.
शहरात सुरू असलेली विविध विकासकामे वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. विकासाची कामे करताना नागरिकांच्या सुविधेचा प्राधान्याने विचार करावा. त्यांना समस्या येणार नाहीत, याकडेही लक्ष द्यावे. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या समन्वयातून ही कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारतर्फे करण्यात येणारे विकास प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी राज्याकडूनही पूर्ण सहकार्य करण्यात येईल.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री