प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे - वाहतूक नियमांचे कोणतेही भंग केलेले नसताना, नियमभंग केल्याबद्दल दंड भरा अन्यथा प्रकरण लोकन्यायालयापुढे ठेवण्यात येईल, असा मेसेज आल्याने अनेक नागरिक चक्रावून गेले आहेत.मात्र, नियमभंग केला नसेल, तर संबंधितांनी घाबरण्याची गरज नसून, मेसेज मधील प्रकरण व्यवस्थापकांशी अथवा वाहतूक शाखेशी संपर्क साधावा, असे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे स्पष्ट करण्यात आले.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दोन लाखांहून अधिक दावे 25 सप्टेंबर रोजी आयोजित लोकअदालतीत निकाली काढण्यात येणार आहेत. त्यासाठी 'सामा' या कंपनीच्या माध्यमातून वाहन चालकांना मेसेजद्वारे नोटीस पाठवण्यात येत आहे.
असा आहे आलेला मेसेज….
'
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून मोटार वाहन कायद्यानुसार शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केल्याबद्दल ऑनलाइन पेमेंट माध्यमातून अथवा जिल्हा न्यायालयातील मोटार वाहन न्यायालय येथे चलनाची रक्कम भरावी, देय रक्कम अथवा तडजोड शुल्क वेळेत न भरल्यास हे प्रकरण लोक न्यायालयाच्या पटलावर घेण्यात येईल,' असे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिक मात्र गोंधळात सापडले आहेत.
माझ्याकडे कोणतेही वाहन नाही. तरीही, मला दंडाची पावती आली आहे. कोर्टाची नोटीस असल्याने मी भीतीपोटी दंडही भरून टाकला. मी राहण्यास नांदेड सिटी परिसरात असताना, पावतीवर गोखलेनगरचा पत्ता आहे.
- संजय पोटदार, नागरिक
वाहतूक नियमांचा भंग केलेला नसताना, सिग्नल तोडल्याबद्दल 2,400 रुपये दंड भरण्याचा मेसेज मला आला आहे. त्यामध्ये वाहन क्रमांक आणि पत्ताही चुकीचा नमूद आहे.
- गौरी लेले, नागरिक
वाहतुकीचा नियमभंग केला असेल, तर ते वाहतूक शाखेने न्यायालयात सिद्ध करणे अपेक्षित आहे. त्याआधीच नोटीस पाठवून, त्यामध्ये प्रकरण वादग्रस्तपूर्व आहे की नाही, याचा कोणताही उल्लेख न करता तडजोडीची रक्कम भरायला लावणे गैर आहे.
- ऍड. चेतन भुतडा, वकील
अनेक नागरिकांना मेसेजद्वारे नोटीस पाठवल्या आहेत. त्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन न केलेल्या, नियमभंग प्रकरणी दंडाची रक्कम पूर्वीच भरलेल्या व्यक्तींनाही हा मेसेज आला आहे. नामसाधर्म्यामुळे चुकीच्या वाहन क्रमांकावरील दंडाचा मेसेजही आल्याची तक्रार केली जात आहे. त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही.