प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : एक लाख रुपयांची लाच घेताना पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकासह दोघे जण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप आहे.त्यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण?
सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय 33 वर्ष) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊराव खांदवे (वय 45 वर्ष, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्याचं आश्वासन देत त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. पाच लाखांपैकी एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना दोघे रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीच्या जाळ्यात सापडले.
सांगलीतही पोलीस अधिकारी रंगेहाथ जाळ्यात
दुसरीकडे, सांगलीतही 25 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय समाधान बिले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केल्याची माहिती आहे. तक्रारदाराला पॉक्सो कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपी करत नाही, असे सांगून त्याच्याकडे पोलीस अधिकाऱ्याने चक्क 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.