प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़; दि. ३ सप्तेंबर गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, सरकारच्या वतीने आयोजित स्मार्ट सिटी चॅलेंजच्या तिस-या क्रमांकावर भारत सरकारने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी स्मार्ट प्रपोजल ची निवड करून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. केंद्र शासन पुरस्कृत स्मार्टसिटी अभियानांतर्गत तिस-या स्थानावर निवड झालेल्या पिंपरी चिंचवड शहराकरिता केंद्र सरकार कढ़ून स्मार्ट सिटी अंतर्गत येणा-या विविध विकासकामे, प्रशासकीय व कार्यालयीन खर्चा साठी तिसरा हप्ता म्हणून र.रु. ४९ कोटी इतका प्रकल्प निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी दिली आहे,
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता केंद्र सरकारकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी १ हजार कोटी रुपये निधीचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला आतापर्यंत रु.५८७.८४ कोटी निधी मिळाला आहे. केंद्र शासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के आणि पिंपरी चिंचवड महापालिका २५ टक्के असा एकूण निधी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणा-या विविध विकासकामांकरीता उपलब्ध् केला जातो. त्याअनुषंगाने स्मार्ट सिटी अंतर्गत सूरू असलेल्या विकासकामांसाठी केंद्र शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती.
शासननिर्णय क्रमांक स्मार्टसि-२०२१/प्र.क्र.१६१/नवि-३३ नुसार केंद्र शासनाकडून तिस-या टप्प्यातील रु. ४६.५० कोटी प्रकल्पनिधी तर प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाकरिता रु. २.५० कोटी रुपये असे एकूण र४९ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्याची र.र. २४.५० कोटी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आली असून सदरचा निधी जिल्हाधिकारी पुणे कोषागारातून आहरित करून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीकडे वर्ग केला जाणार आहे. तसेच, पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वहिस्सा र.रु. २४.५० कोटी वर्ग करण्याची कार्यवाही सुरु असून आठवडाभराच्या आत हा निधी स्मार्ट सिटीसाठी उपलब्ध होणार आहे.