प्राधिकरण हद्दीत राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर जागेचा सातबारा होणार...अजितदादांचाही सकारात्मक प्रतिसाद



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख

पिंपरी चिंचवड़, दि. ५ सप्तेंबर  प्राधिकरणाच्या जागेवर वर्षानुवर्षांपासून घर बांधून राहणाऱ्या नागरिकांच्या नावावर स्वता ची जागा व्हावी यासाठी नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. दादा, हे नागरिक पिंपरी-चिंचवड महापालिकेला प्रत्येक प्रकारचा कर देत आहेत. तरीही कागदोपत्री या जागांवर प्राधिकरणाचा शिक्का मारलेला आहे. दादा, हा सरकारी शिक्का कायमचा पुसून जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच आहे. त्यामुळे भोसरीतील धावडेवस्ती, भगतवस्तीसह पिंपरी-चिंचवडच्या अन्य भागात प्राधिकरणाच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या संबंधित नागरिकांच्या नावावरच त्या जागेचा सातबारा करा, अशी मागणी नगरसेवक रवि लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा प्रश्न समजावून घेत तो कायमचा मार्गी लावण्याबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय घेण्याची ग्वाही नगरसेवक लांडगे यांना दिली आहे.

आता प्राधिकरणाच्या हद्दीतील घरांच्या भूखंडाची मालकी किंवा ताबा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे असणार आहे. या नागरिकांच्या घरावर असणारा प्राधिकरणाचा शिक्का कायमचा पुसण्याची धमक फक्त आपल्यासारख्या नेत्यामध्येच आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेला शहरातील शेकडो कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आपल्यासारख्या पिंपरी-चिंचवडच्या शिल्पकराच्या हातानेच मार्गी लागू शकतो, असा मला ठाम विश्वास आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतील जागांचा सातबारा त्या त्या कष्टकऱ्यांच्या नावावर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन त्या जागेवरील घरे नाममात्र दर आकारून नियमित करण्यात यावीत. त्याबाबत महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची कार्यवाही राज्य सरकारकडून व्हावी. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नाबाबत आपण पुढाकार घेऊन लवकरात लवकर जनहिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post