प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांच्या नाम फलकाला काळे फासून त्यांच्या दालनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आशा तानाजी शेंडगे-धायगुडे ( वय ४७ ) रा.सरिताकुंज,कासारवाडी) यांचा जेल मधील मुक्काम वाढला आहे. शनिवारी (ता.११) पिंपरी न्यायालयाने त्यांच्यासह या गुन्ह्यातील त्यांच्या समर्थक महिलांसह दहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा, पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.दरम्यान, गेल्या तीन आठवड्यात भाजपच्या दोन नगरसेवकांना जेलवारी करावी लागली आहे. परिणामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाला नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या महिन्यात स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना एक लाख १८ हजार रुपयांची लाच एका ठेकेदाराकडून घेतल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. चार दिवस त्यांना पोलिस कोठडीत काढावे लागले. नंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली होती. ३० तारखेला ते जामीनावर सुटले. ते बाहेर येताच नाही, तोच भाजपचे दुसरे नगरसेवक जेलमध्ये गेले आहेत.
या महिन्यात ९ तारखेला नगरसेविका शेंडगे व साथीदार महिलांनी पालिकेत येऊन राडा केला. पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या दालनाबाहेर त्यांनी गोंधळ घातला. पालिका आयुक्तांच्या कामात अडथळा आणत त्यांच्या नामफलकाला काळे फासले. तसेच पालिकेचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांच्याही केबिनमध्ये घुसून त्यांच्या टेबल व खुर्चीवर या टोळक्याने शाई फेकली होती. त्याबद्दल सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा शेंडगे व इतर दहाजणांविरुद्ध नोंदवून पिंपरी पोलिसांनी शेंडगेंसह आठ महिला व दोन तरुणांना लगेचच अटक केली होती. त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी काल (ता.१०) न्यायालयाने दिली होती.
त्यामुळे आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, पुन्हा त्यांची पोलिस कोठडी न मागता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली. आरोपी हे सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले. जप्त करण्यात आलेली शाईची बाटली आरोपींनी कोठून आणली त्याचा तपास करायचा आहे. ११ वा आरोपी संजय शेंडगे याचा शोध घेऊन त्यालाही अटक करायचे असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.