प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ दि.१३ निगडी ऑनलाइन विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या एका व्यक्तीने महिलेशी लग्न करण्याचे आमिष दाखवून ओळख वाढवली. त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून 11 लाख चार हजार रुपये घेतले. लग्नाचे बनावट प्रमाणपत्र महिलेला पाठवून व्यवसायासाठी तिच्या नावावर 80 लाख रुपये कर्ज काढण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता आरोपीने महिलेला धमकी दिली. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.प्रेमराज थेवराज (रा. सिव्हिलायझेशन कॉलनी, नगनलू पार्ट 1, चेन्नई, तामिळनाडू) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.निगडी पोलीस तपास करीत आहेत. तर दूसरी फासवानुकीची घटना सांगवी हद्दी मधील आहे,
संजय कुलभूषण जाधव असे नाव धारण केलेल्या व्यक्तीच्या (रा. चिंचवडगाव. मूळ रा. डी. पी. रोड, रामबाग, कांदिवली, पवई मुंबई) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने रविवारी (दि. 12) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 22 मार्च 2021 रोजी ऑनलाईन घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची आणि फिर्यादी महिलेची मराठी शादी डॉट कॉम यावर ओळख झाली. आरोपीने त्याचे फोटो आणि बायोडाटा पाठवून फिर्यादी सोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. 29 एप्रिल 2021 रोजी फिर्यादीचा वाढदिवस असल्याने आरोपीने 22 मार्च 2021 रोजी फिर्यादी यांना गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. तसेच ते दिल्ली येथे कस्टम विभागात अडकले आहे. तिथे काही पैसे पाठवून ते सोडवावे लागेल, अशी थाप आरोपीने मारली.
त्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून अमर सिंग या इसमाच्या बँक खात्यावर फिर्यादी यांनी अडतीस हजार रुपये पाठवले. त्यानंतर विविध कारणे सांगून आरोपीने फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. या प्रकारात आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 9 हजार 208 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठवण्यास सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी याबाबत पोलिसात धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.