प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नाहीत. ते आपलं ऐकत नाहीत असं म्हणतात. पण असं कसं चालेल. असं होता काम नये. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचा आहे. अजितदादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. आपण त्यांना सांगून बघू. दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. आपण अजित दादांसोबत बसून बोलू. आपल्याला एकत्र काम करायचं आहे. त्यामुळे आमच्या लोकांचही जरा ऐकत जा. नाहीतर गडबड होईल.’संजय राऊत म्हणाले
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले, ‘भोसरी मधून एकही नगरसेवक निवडून आला नाही, याची खंत आहे. भोसरीतून हात मिळाला असता तर आढळराव पाटील खासदार झाले असते. त्यामुळे आता भोसरी मधून काम सुरु करायला हवं. 55 आमदार असतील तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात 40-45 नगरसेवक आले तरी महापौर शिवसेनेचाच असेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आजपर्यंत फडकू शकला नाही. याची खंत वाटते. या दोन्ही शहरात भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असे काम आपण करायला हवे.
व्यासपीठाच्या समोर दरवेळी तेचतेच चेहरे दिसत आहेत. नवीन चेहरे यायला हवेत. व्यासपीठावर गर्दी वाढत आहे. व्यासपीठावरील प्रत्येकाने एक एक जरी नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल, असे राऊत यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त शिवसेनेचं ऐकत नाहीत
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त शिवसेनेचे ऐकत नाहीत, अशी तक्रार माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी संजय राऊत यांच्याकडे केली. त्यावर राऊत म्हणाले, ‘पोलीस आयुक्त सुद्धा आपलं ऐकत नाहीत अशीही तक्रार केली जात आहे. पोलीस आयुक्तांनाही आपण सांगू.’
पत्रकारांना उद्देशून खासदार संजय राऊत म्हणाले, चुकीचे लिहू नका. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज सुरु झाली असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, प्रधानमंत्री कुठे बसतात, गृहमंत्र्यांचे कार्यालय कुठे आहे, याची माहिती घेण्यासाठी ते दिल्लीला गेले असल्याची सारवासारव देखील राऊत यांनी केली.