मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने तपासणी मोहिम सुर झाल्याने अनेक ठेकेदारांचे धाबे दणाणले


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड दि १० स्पतेंबर महापालिकेच्या वतीने विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ठेकेदारांच्या कामांची आणि मनुष्यबळाची तपासणी मोहीम महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने राबविण्यात येत आहे. या मुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले असून प्रत्यक्ष जागेवरील पाहणीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याने या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 या मध्ये सुरक्षा रक्षक पुरविणे, रस्ते साफसफाई करणे, उद्यानांमध्ये कर्मचारी पुरविणे, शाळांची सुरक्षा व स्वच्छता, रुग्णालयांतील मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविणे, रुग्णालयांची स्वच्छता करणे, विद्युत दाहिनीसाठी कर्मचारी पुरविणे, स्मशानभूमी, पाणीपुरवठा, वैद्यकीय व आरोग्यसह अनेक विभागातील कामे ठेकेदारी पद्धतीने देण्यात आली आहेत. या कामांचा ठेका देताना ठराविक कर्मचारी पुरविण्याची अट करारनाम्यामध्ये निश्‍चित करण्यात आलेली असते.

या सर्व कामांमध्ये अनेक ठेकेदारांकडून अटी शर्तीचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा अटीतील संख्येपेक्षा कमी मनुष्यबळ पुरविणे, अर्धवेळ कामगार लावून पुर्ण वेळ भासविणे, स्वच्छता न करणे, सुरक्षा न पुरविणे असे प्रकार करत असल्याची बाब  समोर आल्यानंतर आयुक्तांनी सरसकट ठेकेदारांची तपासणी मोहिम हाती घेतली आहे.

 त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक पथक नेमण्यात आले आहे. हे पथक ठेकेदारांच्या कामांची तपासणी करणार आहे. पथकाच्या वतीने ठेकेदारांनी सुरू केलेल्या कामाच्या तारखेपासून त्यांच्या कामाची पाहणी केली जाईल. त्यामध्ये ठेकेदारांने केलेल्या कामाचा दर्जा, त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता, केलेल्या कामावरून त्याची क्षमता तपासली जाईल.

  तसेच ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना वेळेत व किमान वेतन दिले जाते का याची चौकशीदेखील या पथकाकडून केली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच कर्मचाऱ्यांनी करावयाच्या कामाची गुणवत्ता उत्तम राहील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post