प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड दि २०, सप्तेंबर, परिसरात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. पिंपरी ते दापोडी या अंतरातील काम सध्या पूर्ण केले जात आहे. या कामातंर्गत 5 मेट्रो स्टेशन उभारले जात आहे. कामाचा सध्याचा आवाका लक्षात घेता वर्ष अखेर पर्यंत हे काम पूर्ण करून शहर परिसरातून मेट्रो धावू शकणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी गुरूवारी एका डिजिटल वृत्त वाहिनीशी दिलेल्या विशेष मुलाखतीत खुलासा केला आहे,
बिऱ्हाडे यांच्यासमवेत साधलेल्या संवादात त्यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवडमधून वर्षअखेरपर्यंत मेट्रो धावणार असताना पुण्यातही वनाजपासून रामवाडीपर्यंत (कॉरिडोर 2) पूर्व-पश्चिम प्राधान्य मार्गावर वर्षअखेरपर्यंत मेट्रो धावणार आहे.
करोनाचा मधला काही काळ वगळता मेट्रोचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. चिंचवडपासून स्वारगेटपर्यंतच्या (दक्षिण-उत्तर कॉरिडॉर) मेट्रोचे काम सध्या सुरू आहे. चिंचवडपासून रेंजहिलपर्यंतच्या कॉरिडॉरचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, चिंचवडपासून दापोडीपर्यंतचे काम 90 ते 95 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे वर्षअखेर पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो धावू शकणार आहे.