प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी,चिंचवड शहरात आगामी काळात सुरु होणाऱ्या मेट्रो सेवेबाबत महापौर उषा ढोरे यांनी आज संत तुकारामनगर येथील मेट्रो स्टेशन येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. डिसेंबर 21 अखेर नागरिकांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध करून देणेबाबत नियोजन करावे अशा सूचना महापौर ढोरे यांनी दिल्या. यावेळी संत तुकाराम नगर ते फुगेवाडी व फुगेवाडी ते संत तुकारामनगर अशी ट्रायल रन घेण्यात आली.
उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मेट्रो प्रकल्पाचे डायरेक्टर व्ही. के. अग्रवाल, जनरल मॅनेजर हेमंत सोनावणे, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर संदीप दुबे, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ऑफ ट्रॅक बी. रविकुमार, महापालिका उपअभियंता संतोष पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, नागरिकांसाठी मेट्रो प्रकल्प हा शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शहराच्या नावलौकिकात भर टाकणारा हा प्रकल्प असून उर्वरीत मेट्रो प्रकल्पाची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करुन डिसेंबर 21 पर्यंत मेट्रो सुरु करावी.