क्राईम न्यूज : 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ नराधमांनी केला ३ महिने बलात्कार ; तिघांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

 पिंपरी चिंचवड़ : खेड़ नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केला. यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत सहा जणांनी यावरून तिला धमकावत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. पीडितेने याबाबत तक्रार दिल्यानंतर त्यानुसार खेड पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी सातवीत शिकते. तिच्या मोठ्या बहिणीच्या बाळंतपणानंतर बाळाला उपचारासाठी रूग्णालयात ठेवावे लागल्याने तिची आई घरी नव्हती. त्यामुळे या मुलीला कपडे धुण्यासाठी नदीवर जावे लागायचे. तेव्हा एका संशयित आरोपीने तिला धमकावून एका गाडीत नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर एके दिवशी दुसऱ्याने धमकावून त्याच ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर प्रत्येकाने त्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणी तिला एकटीस गाठून २७ मे ते १५ ऑगस्टच्या दरम्यान तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तसेच तिला व घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार मुलीच्या एका नात्यातील महिलेस समजल्यावर तिने मुलीच्या आईला सांगितला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने याबाबत सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने खेड पोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सोन्या घुमटकर, आकाश शिंदे, परेश ढमाले, अवधूत कानसे, साईनाथ मुळूक, सूरज रोडे (सर्व रा. चास, ता. खेड) यांच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षाराणी घाटे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post