प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड़ दि १२ सप्तेंबर खड़की : पैशाच्या वादातून बोपोडीत टोळक्याने चिकन व्यवसायिकाचा खून केला. रणजित ऊर्फ माँटी सुगंधर परदेशी वय ३२, रा. भाऊ पाटील रोड, बोपोडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास चिकन दुकानदाराचा खून झाल्याची घटना घडली.
याबाबत खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले की, माँटी याचे बोपोडीत चिकनचे दुकान आहे. त्याने यातील एका अल्पवयीन मुलाकडून उसने पैसे घेतले होते. हे पैसे माँटी परत देत नव्हता. या रागातून या अल्पवयीन मुलाने इतर चौघांच्या मदतीने त्याचा खून केला.
बोपोडी परिसरात मेट्रोचे काम सुरु असलेल्या ठिकाणी या अल्पवयीन मुलाने माँटी याला बोलावले. त्यानुसार शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास माँटी तेथे गेला होता.या वेळी पैसे परत देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी या टोळक्याने माँटीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाचही आरोपींना ताब्यात घेतले आहे. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.