ऑल आउट ऑपरेशन मध्ये मोटर सायकल चोरटे झाले आऊट ,कर्जत पोलिसांनी आवळल मुस्क्या...
प्रेस मीडिया वृत्तसेवा : पनवेल : सुनील पाटील
नुकताच बेस्ट पोलीस असा बहुमान मिळालेल्या रायगड पोलीस दलाकडून गुन्हेगारांच्या कारवाया रोखण्यासाठी ऑलआउट ऑपरेशन सुरु करण्यात आले होते. या ऑपरेशन दरम्यान कर्जत येथे मोटारसायकल चोरटेच ऑलआउट झाले आहेत. संशयित म्हणून चौकशी केलेल्या त्या चोरट्यांकडून तब्बल ७ गुन्ह्यांची उकल कर्जत पोलिसांनी केली असून आणखी एका धडक कारवाईने कर्जत पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक २७ सप्टेंबर रोजी रायगड पोलीस दलाकडून ऑलआउट ऑपरेशन जाहीर करण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे तसेच इतर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडून आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे हद्दीत
श्रीरामपुल व चारफाटा येथे नाकाबंदी नेमुन वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी श्रीरामपुल येथे नाकाबंदीकरिता नेमलेलय पोलीस कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना मुरबाड बाजूकडून येणारी संशयीत पल्सर मोटारसायकल त्यांनी अडवली. सदर मोटार सायकलच्या नंबर प्लेटची पाहणी केली असता ती एमेच ४६ वाय ५२२७ असल्याने सदरची मोटार सायकल ही त्यांचेकडील तपासावर असलेला
कर्जत पोलीस ठाणे गु.र.क्र.256/2021 भा.द.वि.क 379 प्रमाणे मधील चोरीस गेलेली मोटारसायकल असल्याची पोलिसांची खात्री पटली. त्यावेळी इतर पोलिसांचे मदतीने सदर मोटार सायकलवरील दोन स्वार इसमांना ताब्यात घेवुन पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी त्यांचे नावे अनिकेत नंदकुमार जाधव वय-22 वर्ष
कोषाणे, आकाश गोविंद मोरे वय-23 वर्ष रा. परळी सुधागड असे सांगितले. त्यावेळी सदर इसमांस पोलीस ठाणे येथे आणुन पोलिसांनी त्यांचेकडे मिळुन आलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस करता ते दोघे उडवाउडवीची
उत्तर देवू लागले. त्यावेळी या दोघांस विश्वासात घेवून पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी मिळून सदरची मोटारसायकल ही भिसेगाव खिंड पेट्रोलपंपाजवळून चोरी केल्याचे सांगितले. सदर इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक तपास करता त्या दोघांनी मिळून कर्जत पोलीस ठाणे तसेच खालापूर पोलीस ठाणे हद्दीतून एकूण ७ मोटारसायकल चोरी केल्याचे तपासात कबुल केले. सदरील आरोपितांनी चोरलेल्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नुकत्याच कर्जत पोलिसांनी २० किलो एवढा गांजा जप्त केल्याची मोठी कारवाई केली होती. तर आता हि दुसरी मोठी कारवाई कर्जत पोलिसांनी केली असल्याने नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यामुळे गुन्हेगारांचे काळे दिवस सुरु झल्याचे बोलले जात आहे. या दुसऱ्या धडक कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
सदरची कामगिरी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत संजय शुक्ला, मा.पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे सुवर्णा पत्की यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे मधील पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, पोलीस पोलीस हवालदार काठे, सुभाष पाटील, हर्षद जमदाडे, पोलीस अंमलदार भूषण चौधरी, अश्रुबा बेद्रे, मंदार माळवी यांनी केलेली आहे