माथेरान मध्ये काम संपल्यावर मालकांना मालवाहू घोडे ठरतात निरुपयोगी, थंड हवेच्या ठिकाणी मालवाहू घोड्यांच्या मालकांचे रक्त ही झाले थंड, आजारपण किंवा अपघात मुका जीव पाहतो मृत्यूची वाट, मुक्या जीवांचे भोग संपणार कधी, प्राणी संघटना पुढे येणार का ?
~~~~~~~~~~~~~~~~
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
कोरोना काळात माणुसकी ओसंडून वाहिली असल्याचे चित्र होते. ते केवळ माणसांसाठीच नव्हे तर माथेरानमध्ये असलेल्या घोड्यांसाठीसुद्धा हजारो किलो खाद्य कानाकोपऱ्यातून आले. मात्र इतरांना वाटत असलेली माणुसकी त्या घोडे मालकांच्या हृदयात नसल्याचे चित्र आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सामानाची वाहतूक करण्यासाठी मालवाहू घोड्यांच्या मालकाचे रक्त थंड झाले असल्याचा आभास होत आहे. कारण आजारी, जखमी, अशक्त झालेल्या घोडयाना सर्रास नेरळ भागामध्ये सोडून दिले जात आहे. तेव्हा आजारपण किंवा अपघात यामध्ये या मुक्या जीवांचा दुर्दैवी अंत होत आहे. जिवंतपणी स्वतःच्या वजनापलीकडे भार वाहून मालकाची भरभराट केल्यानंतर शेवटी त्याच मालकाकडून आलेले हे दुःख त्या मालकाच्या काना मनापर्यंत पोहचत नाही. तेव्हा या मुक्या जीवांचे भोग संपणार कशी असा प्रश्न निर्माण झाला असताना प्राणी संघटना तरी याबाबत पुढे येणार का हा प्रश्न देखील अद्याप निरुत्तरित आहे.
माथेरान हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. पर्यावरण संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनाला बंदी आहे. त्यामुळे येथे प्रवासी वाहतुकीसाठी हातरिक्षा, घॊडे व ट्रेन याने वाहतूक केली जाते, तर माल वाहतुकीसाठी हातगाडी, घोडे यांचा वापर केला जातो. माथेरानमध्ये विकासात्मक दृष्ट्या एमएमआरडीए अंतर्गत माथेरान नगरपरिषद हद्दीत अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहे. त्यासाठी सामानाची वाहतूक करायला घोड्यांचा देखील वापर होत आहे. त्यासाठी येथे जवळपास ५०० ते ६०० घोड्यांच्या पाठीवर मालवाहतुकीचे सामान लादून सामान वाहून नेले जात आहे. याच कामात घोडेमालकांकडून जखमी घोड्यांचा वापर होत असून तीनशे ते चारशे कीलोचे वजन त्यांच्यावर लादुन मरेपर्यंत त्यांची पिळवणूक करण्याचा प्रकार नुकताच घडला होता. तर आता पुन्हा एकदा मालवाहू घोड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खेचर जातीचे असलेले घोडे मोठ्या प्रमाणात नेरळ व नेरळ माथेरान घाटरस्त्यात फिरताना दिसतात. कर्जत कल्याण राज्यमार्गावर रात्रीच्या वेळेस ठाण मांडून बसलेले किंवा फिरत असताना अनेकदा अपघात होऊन त्यात घोडे मरण पावत असल्याच्या घटना घडत आहेत. मुळात माथेरान मालवाहतुकीसाठी हे घोडे वापरात असताना त्यांच्यावर अतिरिक्त भार टाकून त्यांची पिळवणूक होत आहे. तर अधिकचा भार घेतल्याने तसेच कितीही असला तरी तो एक जीव आहे याचा विसर पडलेल्या मालकाकडून त्याची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे ते आजरी, पडणे, अशक्त होणे, त्यांच्या अंगावर असलेले पोते पावसाळ्यात ओले होऊन ते कुजून घोड्याच्या पाठीला, मानेला जखमा होणे तसेच त्या जखमांवर उपचार न करणे आदी मालकांच्या हलगर्जीपणामुळे उध्दभवलेल्या या कारणांमुळे हे घोडे त्यांच्यासाठी निरुपयोगी होत आहेत. तर असे निरुपयोगी घोडे नेरळ परिसरात सोडले जात आहेत. मात्र तेच घोडे ठीकठाक असताना त्यांच्यावर प्रमाणाबाहेर बोजा वाहून त्यांच्या जीवावर घर भरणाऱ्या मालकांचे रक्त थंड झाले असल्याचे चित्र आहे. तेव्हा या मुक्या जीवांची त्यांच्या आजारपणात नैतिक जबाबदारी न स्वीकारणाऱ्या मालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
~~~~~~~~~~~~~~~~
माथेरानमध्ये सध्या मालवाहू ३०० च्यावर घोडे आहेत. कित्येक घोड्यांना वेळेवर पोटभर खाद्य व पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने मालवाहतूक करण्यासाठी वापरलेले घोडे अर्ध्या रस्त्यात देखील पडत आहेत. प्रशासनाकडुन मालवाहतूक घोड्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतीही कारवाई करत नसल्याने माथेरानकरांना भविष्यात घोड्यांपासुन होणार्या ग्लेंडर सारख्या महाभयंकर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सामाजिक कार्यकर्ते जैतू पारधी
~~~~~~~~~~~~~~~
खरंच मुक्या प्राण्यांची व्यथा खूपच जिव्हारी लागते. याबाबत आम्ही देखील अनेकदा घोड्यांवर अधिक भार लादलेला दिसला तर मालकाला हटकत असतो. तर याबाबत पोलीस प्रशासनाला देखील कारवाई करण्याची विनंती केली आहे. खरं पाहता यामध्ये शासनाने लक्ष देण्याची मोठी गरज आहे. माथेरानमध्ये जी काम सुरु आहेत. त्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने घोड्यांचा वापर केला जातो. त्याऐवजी जर ठराविक कालावधीसाठी शासनाने या कामादरम्यान साहित्य वाहतूक करण्यासाठी वाहन परवानगी दिली तर काम वेळेत होईल आणि या मुक्या जीवांवरही ताण पडणार नाही.
: प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान
~~~~~~~~~~~~~~~~
माथेरानमध्ये मालवाहतूक करण्यासाठी जे घोडे वापरले जातात ते खेचर जातीचे घोडे आहेत. खरं पाहता हे घोडे वाहतूक करण्यासाठी जरी असले तरी त्यांची पाठीवर सामान वाहून न्यायची क्षमता हि फक्त ५० किलोग्रॅम आहे. तेव्हा त्यांच्यावर अधिक भार पडला तर साहजिक ते आजारी पडणारच. त्यात त्यांची काळजी देखील घेणे महत्वाचे आहे. आमच्याकडे प्रवासी घोडे यांचा डेटा आहे. कारण त्यांची नोंद करण्यात आलेली आहे मात्र मालवाहू घोड्यांची नोंद व लसीकरण करण्यात येत नाही. मात्र एखादा जखमी घोडा आमच्याकडे आल्यास त्यावर आम्ही उपचार करतो.
: डॉ. ए.आर.रजपूत, पशुवैद्यकीय अधिकारी, माथेरान
~~~~~~~~~~~~~~~~
नेरळ परिसरात गेले दोन महिन्यात ६ ते ७ घोडे हे मृत्युमुखी पडले आहेत. तर काल परवा मध्ये घडलेल्या प्रकारात घोड्याला टेम्पो चालकाची धडक लागली त्यात तो टेम्पो चालक थोडक्यात बचावला. मात्र तो घोडा मुत्यूमुखी पडला. या अपघातात टेम्पोचालक याचे काही झाले असते तर ती जबाबदारो कोणाची होती. रात्रीच्या अंधारात हे मोकाट सोडलेले घोडे दिसत नसल्याने कर्जत कल्याण मार्गावर शेलू नेरळ दरम्यान अपघात घडत आहेत. मात्र घोड्यांच्या मालकांना याचे सोयरसुतक नाही. ज्या घोड्यांच्या जीवावर हे माथेरानमध्ये कमावून खातात. त्यांना अशक्त, आजारी झाल्यावर असे वाऱ्यावर सोडून दिले जाते. त्यामुळे पुढे असे अपघात घडल्यास या घोडेमालकांवर गुन्हे दाखल करायला हवेत त्याशिवाय या मुक्या जीवांची किमंत यांना समजणार नाही.
: गोरख शेप, मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष रायगड
~~~~~~~~~~~~~~~~
गेल्या ४ पिढ्या आम्ही हा व्यवसाय करतोय. त्यामुळे घोड्याची उत्तमरीत्या काळजी आम्ही घेत असतो. त्याला हालचालींवरून त्याला काय होतंय हे समजण्याची कुवत आमच्यात आहे. आमच्या संघटनेत साधारण १५० घोडे आहेत. त्यांचे आरोग्य उत्तम आहे त्यामुळे आमच्या सदस्याला वाऱ्यावर सोडण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. मात्र मागील काही काळात बाहेरून इतर अनेक जण मालवाहू घोडे घेऊन माथेरानमध्ये व्यवसाय करीत आहेत. त्यांना घोडे सांभाळायची देखील माहिती नाही. तेव्हा त्यांच्याकडून असले प्रकार होत आहेत. उलटपक्षी असे रस्त्यावर सोडून दिलेले घोडे प्रशासन त्यांची निगा राखणार असल्यास आम्हाला सांगितल्यास ते पकडून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.