देशात 177 व्या क्रमांकावर ,मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल सुनील पाटील :
कर्जतकर प्रतिक जुईकर यांनी रायगडकरांची मान उंचावली आहे.24 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) निकालात मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. ते देशात 177 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. याचबरोबर ते रायगड जिल्ह्यातील पहिले थेट आयएएस होण्याचा मानही प्रतिक जुईकर यांनी मिळवला आहे. या यशानंतर जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.दरम्यान,थेट आयएएस बनलेले प्रतीक जुईकर रायगड जिल्ह्यातील पहिले अधिकारी बनले असून मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून अद्वितीय कामगिरी प्रतीक जुईकर यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी बनलेले प्रतिक चंद्रशेखर जुईकर हे मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारे आहेत. कर्जत तालुक्यातील कोल्हारे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचे ते सुपूत्र आहेत. पहिल्यापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीचे असलेले प्रतिक जुईकर यांना वाचनाची आवड होती.कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर शाळेर दहावी परीक्षेत कर्जत तालुक्यातून पहिले आले होते.पुढे त्यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि ते बी.टेक झाले.त्यानंतर नोकरी करत असताना, तेथील मित्र हे आयआयटी करुन युपीएससीची तयारी करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, प्रतिक जुईकर यांनीही युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. प्रतिक यांच्या आई-वडिलांचीही ते आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती.
अथक परिश्रम करीत, प्रतिक जुईकर यांनी त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले .