प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी :सुनील पाटील
नेरळ रेल्वे स्थानकालगत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नऊ दुकानांमध्ये 19 सप्टेंबरच्या पहाटे चोरीच्या घटना घडल्या आहेत.सुट्ट्या पैशांची चिल्लर आणि खाद्य पदार्थ यांच्यावर चोरट्यांनी डल्ला मारला असून नेरळ पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल या मुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
नेरळ पोलीस ठाण्याचे हद्दीतील नेरळ रेल्वे स्टेशन लगत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.त्या मार्गावर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत मागील काही वर्षात रस्त्याच्या जागेत अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. बांधकाम करून उभ्या राहिलेल्या त्या दुकानांमध्ये व्यवसाय करणाऱ्या नऊ दुकानांना 19 सप्टेंबरच्या पहाटे चोरट्यांनी लक्ष्य केले.तेथील चिराग बेंगल स्टोर,कोमल साडी सेन्टर,बबलू टी स्टॉल आणि अन्य सहा अशा नऊ दुकानांमध्ये चोरी केली. लोखंडी शटर लोखंडी हत्याराने वाकवून त्या दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत.त्यानंतर या दुकानदारांनी सकाळी नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेची माहिती दिली.नेरळ पोलिसांनी तक्रार नोंद केली असून चोरट्यांनी त्या दुकानांमधून रोख रक्कम तसेच सुट्या पैशांची चिल्लर आणि खाद्य पदार्थ यांच्यावर ताव मारला आहे.
पोलिसांनी त्याबाबत तपास सुरू केला असून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नेरळ रेल्वे स्थानक येथील सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.चोरीची घटना झालेली दुकाने ही नेरळ रेल्वे स्टेशन लगत आणि नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र या दरम्यान असल्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेरे हे चोरांना पकडण्यासाठी नेरळ पोलिसांच्या मदतीला येतील अशी शक्यता आहे.त्या दृष्टीने नेरळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे,मात्र नव्याने नेरळ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून दाखल झालेले पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्यासाठी नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडत असलेल्या घटना हे मोठे आव्हान बनले आहे.18 सप्टेंबर रोजी बोरगाव कळंब येथे झालेला खून आणि त्यानंतर चोरीच्या घटना लक्षात घेता नेरळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.