प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई दि. 2 - आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ विचारवंत फुले आंबेडकरवादी लेखिका; स्त्री मुक्ती चळवळीच्या लेखिका; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत गेल ऑम्वेट यांच्या जाहीर आदरांजली सभेचे आयोजन परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. येत्या रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात दिवंगत गेल ऑम्वेट यांच्या जाहीर आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिवर्तन साहित्य महामंडळातर्फे दिवंगत गेल ऑम्वेट यांच्या जाहीर आदरांजली सभेस ज्येष्ठ विचारवंत अविनाश महातेकर;ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे; मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे; संपादक बबन कांबळे; आणि परिवर्तन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. ऋषिकेश कांबळे आदी मान्यवर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असणार आहेत अशी माहिती संयोजक गौतम सोनवणे आणि परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस वैभव काळखैर यांनी दिली आहे.
दिवंगत गेल ऑम्वेट यांनी दलित आदिवासी कष्टकरी वर्गासाठी तसेच परित्यक्त स्त्रिया; दुष्काळग्रस्त अशा सर्व समाज घटकांसाठी काम केले.त्यांचे नुकतेच दि. 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. अमेरिकेत जन्मलेल्या डॉ. गेल ऑम्वेट यांनी बुद्ध शाहू फुले आंबेडकरी विचार आत्मसात करून संपूर्ण जीवन परिवर्तन चळवळी साठी वाहिले. त्यांची आंबेडकरी विचारांशी नाळ घट्ट जुळली होती. त्यामुळे परिवर्तन साहित्य महामंडळाच्या वतीने दिवंगत गेल ऑम्वेट यांना जाहीर श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या सभेचे आयोजन मुंबईत करण्यात आले असून आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी या आदरांजली सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.