प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे कान्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महानगरपालिका कार्यकारी अभियंता सुमिता शिर्के यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता.यासंबंधित कथित कॉल रेकॉर्डिंग गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मौन बाळगून होत्या. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.
स्वत: च्या पक्षाच्या आमदारांना गुन्हा पाठिशी घालणाऱ्यांना दर मिनिटाला खोटं बोलावं लागतंय. एकाच वेळी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात. ही मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचीच लक्षणं आहेत. हा आजार अतिशय भयानक आहे. चित्रा वाघ यांनी वेळीस तपासणी करून तब्येतीची काळजी घ्यावी, अशी खोचक टीका रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.
सुमिता शिर्के या महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित आमदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुणे आयुक्तांकडे केली आहे. कोणत्याही महिलेवर अथवा महिला सरकारी अधिकाऱ्यावर अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे. आणि जर या काॅल रेकॉर्डिंगमध्ये काही तथ्य आढळ्यास संबंधित आमदाराला शिक्षा व्हावी, असंही प्रदिप कणसे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, राज्यात गेल्या काही महिन्यापासून महिलावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष ठाकरे सरकारवर टीका करत आहे. त्यातच आता रूपाली चाकणकर यांनी टीका केल्याने चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात हे पहावं लागणार आहे.