प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अखेर त्यांना ठोठावण्यात आलेला 50 हजार रुपयांचा दंड भरला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेल्या आरोपाची न्या.चांदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे.या प्रकरणात आयोगापुढे हजर राहून प्रतिज्ञापत्रं सादर न केल्याने त्यांना हा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानुसार पमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत दंडाची रक्कम जमा केली आहे. परमबीर सिंग यांना तीन वेळा दंड ठोठावला होता. आधी 5 हजार रुपये, नंतर 25 हजार रुपये आणि त्यानंतर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
त्यानुसार दंडाची रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्यात आल्याची माहिती परमबीर यांचे वकील अनुकूल सेठ यांनी दिली. न्या. चांदीवाल आयोगाकडून सुरू असलेल्या चौकशीला आव्हान देणारी याचिका सिंग यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. ही बाब लक्षात घेता चौकशी आयोगापुढील सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीला परमबीर यांनी प्रत्यक्ष हजर राहावे, अन्यथा आणखी कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Tags
Mumbai