प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सोमवारी दुपारपासून मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या धुवाधार पावसाने बीड जिल्ह्यात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव तालुक्यात परिस्थिती गंभीर झाली आहे.अंबाजोगाई, केज तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत, बंधारे फुटले आहेत. पुले वाहून गेली आहेत. धरणे खचाखच भरली आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहेत. ग्रामस्थांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ बोटसहित तैनात करण्यात आले आहेत. तर दुपारपर्यंत अंबाजोगाई हेलिकॉप्टरला पाचारण केले जाणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्रभर झालेल्या जोरदार पावसाने जिल्हा जलमय झाला आहे. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्रीपासूनच मांजरा धरणाचे सहा दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. दरवाजे उघडत असताना वीज पुरवठा खंडीत झाला. धरणस्थळी मोठा आवाजही झाला. जनरेटरच्या मदतीने दरवाजे उघडण्याचा प्रयत्न झाला. रात्री एक वाजता विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तब्बल 18 दरवाजे उघडण्यात आले. 70 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
माजलगाव प्रकल्पातूनही मोठा विसर्ग सुरू आहे. अंबाजोगाई, केज आणि परळी तालुक्यातील अनेक गावांना पाण्याने वेढा दिला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा गावात शिरले आहे. आपेगावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोटसहित दाखल झाले आहेत. लातूरहूनही जादा कुमक मागवण्यात आले आहे. देवळा गावाला पाण्याने वेढा दिला आहे. परळी तालुक्यातही काही गावांना वेढा दिला आहे.
केज तालुक्यामध्ये बंधारे फुटले आहेत, शेती वाहून गेली आहे, भाटुंबा, कुंबेफळ, पिसाटी, मांजरसुंबा, अंबाजोगाई रस्ते बंद करण्यात आले आहेत. अंबाजोगाई-कळंब रस्ताही बंद करण्यात आला. सावळेश्वराचा पुल पाण्याखाली आहे. बीड जिल्ह्यातील तीन तालुक्यात परिस्थिती भयंकर झाली आहे. आपेगाव येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सध्या बोटीचा उपयोग केला जात असला तरी हेलिकॉप्टरलाही पाचारण केले जाणार असल्याची शक्यता आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी तशा सूचना दिल्या आहेत. संपूर्ण प्रशासन लक्ष ठेवून आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेशही दिले आहेत.