पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी अतिआनंदायक बातमी नोव्हेंबरपासून दररोज होणार पाणी पुरवठा



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड  : पवना धरण १०० टक्के भरले असले तरी सध्या दररोज पाणीपुरवठा करता येणार नाही. नवीन यंत्रणा उपलब्ध केली जात आहे. नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर २०१९ पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. आजमितीला धरणात १०० टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला. पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिले होते.

याबाबत विचारले असता आयुक्त पाटील म्हणाले, पाणीपुरवठा नियमित करा असे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. सध्या दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नाही. पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. नोव्हेंबरपासून दररोज पाणीपुरवठा करता येईल. निगडी, प्राधिकरणात चोवीस तास पाणीपुरवठा योजना सुरु केली आहे. मागील तीन महिन्यांपासून ही योजना कार्यान्वित आहे. त्यासाठी पहिले एक महिना जास्त पाणी लागते. त्यानंतर कमी पाणी लागते. आणखी पाच ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post