शहरात सक्षम वैद्यकीय सुविधा निर्माण केली- महापौर माई ढोरे



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

पिंपरी चिंचवड़ दि १४सप्तेंबर, गेल्या दीड वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरातच नव्हे तर जगात करोनामुळे हाहा कार माजलेला असतना वैद्यकीय सुविधेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. नागरिकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे असल्यामुळे आम्ही गेल्या वर्षभरात महापालिकेची स्वत:ची सर्व सुविधा असलेली चार रुग्णालये उभी केली. तसेच सक्षम वैद्यकीय सुविधा निर्माण केल्यामुळे करोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.

पिंपरी येथील विभागीय कार्यालयात गणेशोत्सवानिमित्त महापौर आल्या होत्या. त्यावेळी एक डिजिटल वाहिनीला  दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शहरात उभारण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधा तसेच भाजपाने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, मला महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच करोनाची पहिली लाट आली. या काळात नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याला आम्ही प्राधान्य दिले. महापालिकेच्या माध्यमातून काम करताना आम्ही जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम केले.

पहिल्या लाटेचा अनुभव विचारात घेऊन महापालिकेच्या माध्यमातून चार सुसज्ज नवीन रुग्णालये उभारली. त्यामध्ये थेरगाव, भोसरी, आकुर्डी आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाचा समावेश आहे. ही रुग्णालये सुरू करण्यात यश आल्याचे मोठे समाधान आहे. एका बाजूला करोना नियंत्रणात आणताना शहरातील विकासकामेही कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साडेचार वर्षांत आम्ही जी कामे केली ती विरोधकांनी त्यांच्या सत्तेच्या दहा वर्षांच्या काळातही केलेली नाहीत, असा दावाही ढोरे यांनी यावेळी केला.

टिकेला घाबरत नाही.....महापौर माई ढोरे 

टीका करणे हे विरोधकांचे काम असून टिकेला आम्ही घाबरत नसल्याचे महापौर माई ढोरे यावेळी म्हणाल्या. गेल्या साडे चार वर्षांतील कामांच्या जोरावर जनता भाजपालाच पुन्हा महापालिकेत संधी देईल याचा विश्‍वास असून शहरात दळणवळणाच्या साधणासह पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सोडविण्यात यश आले आहे. निगडीतील सर्वांत मोठा आणि महाराष्ट्रालाही अभिमान वाटेल असा उड्डाणपूल उभा केल्याचा दावाही महापौरांनी यावेळी केला.

Post a Comment

Previous Post Next Post