श्री दत्त भांडारची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ/प्रतिनिधी:
श्री दत्त भांडारची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. २०२०-२१ या सालासाठी सभासदांकरिता १० टक्के प्रमाणे लाभांश वस्तूरुपाने येत्या दिपावली सणामध्ये देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या शिरोळ येथील संस्थेच्या सभागृहात दुपारी १२ वाजता ऑनलाइन झूम ॲप द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
सभेचे नोटिस वाचन व श्रद्धांजलीच्या ठरावाचे वाचन जनरल मॅनेजर सदानंद घोरपडे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक करताना चेअरमन दामोदर सुतार म्हणाले, लॉकडाऊन काळात शासनाने अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाप्रमाणे शासनाच्या निर्बंधाचे पालन करत संस्थेच्या सर्व सेवा चालू ठेवल्या. श्री दत्त उद्योग समूहाचे आधारस्तंभ व आपल्या संस्थेचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सर्व सेवकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत धीर दिला. त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे, निष्ठेने कोरोना योद्धासारखे काम केले. त्यामुळे विक्री वाढून २३ लाख ५१ हजार रुपयांची व्यापारी नफ्यातही वाढ झाली आहे. उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, ग्राहकांसाठी वार्षिक ६० हजाराच्या खरेदीवर १ लाखाचे अपघाती विमा संरक्षण योजना सुरु केली आहे. अद्ययावत नूतनीकरण, उत्तम गुणवत्ता आणि दर्जेदार वस्तू भांडारमध्ये मिळत असल्यामुळे आसपासच्या भागातील नागरिक खरेदीसाठी येत आहेत. तांदूळ, डाळी, कडधान्य, आंबा महोत्सव, दिवाळीकरिता विक्रीवर्धक भेटवस्तू वितरण योजना, कर्मचाऱ्यांना ५ लाखाचा अपघाती विमा योजना अशा विविध उपक्रमांतून या संस्थेने विश्वासार्हता जपली आहे.
प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. गणपतराव पाटील यांचा सत्कार संस्थेचे संचालक विजयकुमार गाताडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्हॉईस चेअरमन सौ. अनिता कोळेकर, दत्तचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संस्थेचे सर्व संचालक, परचेस गोडाऊन प्रमुख सुहास मडिवाळ, अकाउंटंट भाऊसो पाटील, कॅशियर दिपक ढोणे, वरिष्ठ लिपिक शहाजान बाडकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. आभार संचालिका डॉ. राजश्री पाटील यांनी मानले.