प्रेस मीडिया वृत्तसेवा :
साकीनाका येथे झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक झाली असून त्यांच्यावरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली.शिंदे यांनी जे. जे. रुग्णालयात जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच या पीडित महिलेची आई आणि मुलगी यांचे सांत्वन केले. पीडित महिलेच्या दोन्ही मुलींचा पुढील शिक्षणाची जबाबदारी शासन आणि शिवसेना स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले.या घटनेतील महिलेसोबत घडलेली घटना संतापजनक आणि निंदनीय असून या प्रकरणातील प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. या आरोपीवरील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. या आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून अशा कारवाईतून गुन्हेगारांवर जरब बसली तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असे शिंदे म्हणाले. महिला सुरक्षेबाबत शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पीडित महिलेच्या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून त्याना लागेल ती मदत पोहोचवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीडित महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तातडीची बाब म्हणून शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदतही दिली.
शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनात येणार
महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या शक्ती कायद्याचा मसुदा विधिमंडळाच्या कायदाविषयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आला असून, येत्या हिवाळी अधिवेशनात ही समिती आपला अहवाल तयार करून विधानसभेच्या पटलावर ठेवेल. त्यांनतर या कायद्याबाबत पुढील निर्णय होईल असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी साकीनाका विभागाचे स्थानिक आमदार दिलीप लांडे हे देखील सोबत उपस्थित होते.