सैनिक टाकळी / प्रतिनिधी
पंजाबनंतर शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कॅन्सरचे पेशंट आहेत , त्यामुळे शेतीसाठी नवे पर्याय द्यायला हवेत , रासायनिक वापर टाळायला हवा. व्यसनापासून लांब राहायला हवे , वेळोवेळी आपल्या आरोग्याच्या रक्त-लघवी , सोनोग्राफी तपासण्या करायला हव्यात. व्यसनाधीनतेमुळे तरुण वयात तोंडाचे-पोटाचे कॅन्सर वाढत आहेत. तंबाखू , गुटखा , मावा यापासून तर लांब रहावे, कॅन्सर मुक्तीसाठी व्यसनमुक्ती गरजेचे असल्याचे प्रतिपादन जीवक लाईफ सायन्सेस आणि मॉडर्न होमिओपॅथी चे सी. ई. ओ. डॉ.विजयकुमार माने यांनी केले.
डॉ.माने हे सैनिक टाकळी (ता.शिरोळ) येथील सीमा लढ्यातील सेनानी, शेकापचे ज्येष्ठ नेते भाई विलासराव पाटील (आण्णा) यांच्या तारखेनुसार प्रथम स्मृतिदिनानिमित्त अनिष्ट रूढी , परंपरा, जेवणावळी यांना फाटा देऊन पुरोगामी शिवधर्म पध्दतीने आयोजित केलेल्या " आरोग्य महोत्सवात " बोलत होते.
आरोग्य महोत्सवाचे आयोजन करून प्रा.विनोदसिंह आणि डॉ.विकास पाटील यांनी समाजाला दिशा दिली.भाई विलासराव पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी शिवाभिवादन करून जिजाऊ वंदनेनंतर , आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आरोग्य महोत्सवाचे उद्घाटन केले , तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील होते.
डॉ.माने बोलताना पुढे म्हणाले , जीवन आणि मृत्यू एकदाच आहे. चांगले कार्य या जन्मातच करावे , यासाठी हा जन्म जास्तीत जास्त आरोग्यदायी जगण्याकडे लक्ष द्यावे . अवेळी जेवण अति ताणतणाव टाळले पाहिजेत . वेळच्यावेळी पुरेशी झोप घ्या , स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे . रोज अर्धा तास चालायला हवे. योगासने आणि चालणे हाच सर्वात चांगला व्यायाम आहे . निवांत रहा खळखळून हसा, चांगले जेवण घ्या. ताणतणावापासून लांब रहा . निश्चितपणे आपली आयुष्य मर्यादा वाढेल . तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील सर्व प्रकारचे असाध्य समजले जाणारे आजार मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचाराने बरे झालेले आहेत,असेही डॉ.माने म्हणाले.
सनराईज पॅथलॅब, पिंपरी चिंचवड चे सी.ई. ओ. संदीप कांदे-पाटील यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचे महत्व स्पष्ट केले. योग्य वेळी आरोग्य तपासणी करून काही बिघाड असल्यास त्याच्यावर त्वरित उपचार करता येतात व भविष्यातील मोठ्या जीवघेण्या आजारपणास टाळता येत असल्याचे कांदे-पाटील म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विकास पाटील यांनी हर्बल-आयुर्वेदिक औषधांच्या तसेच समुपदेशनाच्या सहाय्याने घरीच राहून , कमी खर्चात , कमी वेळेत , सहज साध्या सोप्या पद्धतीने व्यसनमुक्ती-शुगरमुक्ती शक्य असल्याचे डॉ. विकास पाटील यांनी सांगितले.
वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगलीचे प्रा. संजीव पोफरे सर यांनी व्यवसाय मार्गदर्शन केले. तरुणांनी नोकरीच्या मागे लागून पगार घेणारा बनण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभा करून दुसऱ्यांना पगार देणारा उद्योजक बनावे , असे आवाहन केले. नोकरीतून मिळणारे वेतन हे मर्यादित असते तर व्यवसायातून अमर्यादित उत्पन्न मिळवता येते.
आलेल्या सर्व श्रोत्यांना पुरुषोत्तम खेडेकर लिखित " मराठा आरक्षण " या पुस्तकाचे आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या वतीने कोरोना , डेंग्यू ,मलेरिया , लेप्टो प्रतिबंधात्मक औषधाचे वाटप करण्यात आले .
भाई विलासराव पाटील-आण्णा प्रथम स्मृतीदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमस्थळी जीवक लाइफ आणि न्यूट्रिफिल हेल्थ प्रॉडक्ट कोल्हापूरच्या वतीने आयुर्वेदिक औषध प्रदर्शन व प्रबोधन पुस्तक एक्सप्रेस च्या वतीने ग्रंथ प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले होते.आरोग्य महोत्सवाचा १५० लोकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोटणे सर यांनी , प्रास्ताविक प्रा. विनोदसिंह पाटील यांनी तर पाहुण्यांची ओळख डॉ.विकास पाटील यांनी करून दिली. मान्यवरांचे स्वागत अशोक पाटील, मधुकर पाटील व विश्वलता पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू गौरव ग्रंथ व महात्मा फुले समग्र वाडग्मय ग्रंथ देऊन केले.
या कार्यक्रमास शिरोळ पं. स. सभापती दिपाली परीट, ज्येष्ठ नेते डी.आर. पाटील , माजी उपसरपंच रणजीतसिंह पाटील, उपसरपंच सुदर्शन भोसले , अजित देसाई ,कुरुंदवाड उपनगराध्यक्ष दिपक गायकवाड ,महेंद्र बागी , बाबासो बाबर, सुशांत कोष्टी, विक्रम खराडे, सतिश बन्ने, छ.शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद पाटील,लेखक मनोहर भोसले, संताजी पाटील ,नेताजी पाटील ,युवराज नेजकर , संतोष नागवंशी ,महेश शिवशरण , सुनील काळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार मिलिंद पाटील यांनी मानले.