प्रेस मीडिया वृत्तसेवा : सुनिल पाटील :
माथेरानच्या निसर्गातून शीळ घालत निघणारी मिनिट्रेन शटल सेवा सुरळीत चालू राहावी यासाठी मध्य रेल्वेकडून माथेरान रेल्वे स्थानकात डिझेल कार्यशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्यामुळे नेरळहुन माथेरानकडे गाडी येऊ शकत नाही, यासाठी रेल्वेने मिनीट्रेनची कामे माथेरान मध्येच सुरू केली आहेत. यामुळे उभारलेल्या लोको शेडमुळे मिनिट्रेनचा मार्ग सुकर झाला आहे.
मिनिट्रेन सुरू होऊन 114 वर्षे होऊन नेरळ-माथेरान या 21 किलोमीटर अंतरावर मिनिट्रेन आजही डौलात धावत आहे. इतका काळ उलटल्यानंतर या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या दरडीमुळे नेरळ-माथेरान मार्ग बंद होतो त्यामुळे याचा परिणाम शटल सेवेवर होतो. शटलसेवेचे इंजिन व डब्बे यांची अभियांत्रिकी कामे नेरळ येथे लोको शेड असल्यामुळे माथेरानमध्ये होत नव्हत्या. मिनिट्रेन शटल सेवा विना व्यत्यय सुरू राहावी यासाठी मध्य रेल्वेने लोकोची कामे माथेरानमध्ये करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पिट लाईनचे काम पूर्ण करण्यात आले. पिट लाईनमुळे इंजिन व डब्यांच्या खालील बाजूची अभियांत्रिकी कामे करणे सोपे जाते. तसेच डब्यांच्या चाकांचे कामे करण्यासाठी क्रेनचा वापर करून डब्यांची दुरुस्ती केली जात आहे.
यावर्षी आतापर्यंत 4 हजार पाचशे मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली असून जोरदार पावसात सुद्धा अमनलॉज-माथेरान शटल सेवा विना व्यत्यय सुरू आहे. घाटातील दरडी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून लवकरच नेरळ-माथेरान मिनिट्रेन सुरू होईल अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.