प्रेस मीडिया वृत्तसेवा : : सुनील पाटील
कर्जत नगरपरिषदेच्या वतीने महिला बालकल्याण अंतर्गत सुवर्ण कन्या योजना राबविण्यात येत आहे, आज एक लाभार्थींला 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या संकल्पनेतून कर्जत नगरपरिषदेच्या वतीने महिला बालकल्याण अंतर्गत सुवर्ण कन्या योजना राबवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नगरपरिषद क्षेत्रात या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमध्ये समावेश असलेल्या महिलेस कन्यारत्न प्राप्त झाल्यास तिच्या उपचारासाठी आणि पौष्टिक आहारासाठी नगरपरिषदेच्या वतीने आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावर रक्कम पाच हजार वर्ग करून सदर योजनेचा लाभ देण्यात येतो, सदर योजना 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आली आहे. आतापर्यत 4 महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
या योजनेसाठी पात्र ठरलेल्या संजीवनी किरण वाघमारे यांना नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकरी डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते धनादेश देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेविका संचिता पाटील, प्राची डेरवणकर नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सायली निंबरे उपस्थित होत्या. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी हे पैसे आईने आपल्यावर व आपल्या मुलीच्या पौष्टिक खाण्यावर खर्च करावेत असे सांगितले.