प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन माध्यमातून घेतली जात होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून सर्व बाबी पूर्वपदावर येत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेला ऑफलाईन पद्धतीने / प्रत्यक्ष उपस्थितीत सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन पध्दतीने अर्थात प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वनविभाग मंत्रालयाने आदेश दिले आहेत.
कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे जसे सुरक्षित सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे, वारंवार सॅनिटायझरचा उपयोग करणे तसेच सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत वापर करणे यांसारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास देखील आदेशात सांगण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेची आगामी सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.