गझलसाद ' चा बहारदार मुशायरा



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

कोल्हापूर ता.२७ 'वेदना देती व्यथा निष्ठा हवी आहे ,मागते त्याच्याकडे ती जो कवी आहे ' या शेरांतून ज्येष्ठ गझलकार खलील मोमीन यांनी कवी आणि कविता यांचे वेदना व संवेदनेशी असलेलं नातं अधोरेखित केले.तसेच विविध गझला  सादर केल्या.'गझलसाद ' यांसंस्थेच्या  वतीने गझलसादी मुशायऱ्याचे आयोजन खलील मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. या मुशायऱ्यात प्रसाद कुलकर्णी, नरहर कुलकर्णी, हेमंत डांगे,डॉ.दिलीप कुलकर्णी, प्रा.डॉ.सुनंदा शेळके,डॉ.संजीवनी तोफखाने,अशोक वाडकर,डॉ.दयानंद काळे,सारिका पाटील,युवराज यादव यांनी आपल्या गझला सादर केल्या.

                     ' खुशाल ना? मलाच मी विचारते कधी कधी,

करी चुका जरी किती सुधारते कधी कधी ' असे म्हणत डॉ.संजीवनी तोफखाने यांनी स्त्रीमनाची घालमेल मांडली.तर प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांनी 'कधीतरी तू प्रियकर होना, सहज म्हणाले,अवचित येऊन जवळी घेना, सहज म्हणाले ' या शब्दात स्त्रीच्या प्रेमाकांक्षेची अपेक्षा व्यक्त केली.सारिका पाटील यांनी ' कुठेच नाही जगात असली आधाराची जागा,

बापच केवळ चूकभुलीवर चादर होऊ शकतो ' या शब्दात पित्याची महानता अधोरेखित केली.

                  ' हेमंत डांगे यांनी ' तुझीच सोबत,दिशांत दाही 'अशी छोटया बहरची बहारदार गझल सादर केली.डॉ.दिलीप कुलकर्णी यांनी'  घरपण होते बेघर भरल्या घरात शिरता विषवेली , सुखासुखी ना कुठे जन्मते कविता व्यथेत भिजलेली ' अशी कविता जन्माची वेणा मांडली.युवराज यादव यांनी ' भांडणतंटे - व्यसनांच्या विळख्यात अडकली गावे,गावासाठी  झिजेल जो त्याला सरपंची द्यावी ' या शेरांतून गावाची अवस्था व अपेक्षा मांडली.नरहर कुलकर्णी यांनी 'कोण जाणे ही कुणाची हाक आली, सांजवेळी,का अशा ह्रदयात झाल्या हालचाली, सांजवेळी ? या शब्दात उतार वयातील प्रेमभावना हळूवारपणे मांडली.अशोक वाडकर यांनी ,जगणे कसे म्हणावे तगणेच भाग झाले,तरणे कसे म्हणावे विरणेच भाग झाले ' असे म्हणत जीवनसंघर्षातील अपरिहार्यता मांडली.डॉ.दयानंद काळे यांनी 'जे हवे तेच मी बोलतो विठ्ठला,चूक इतकीच मी मानतो विठ्ठला 'असा सत्य बोलण्याच्या परिणामांचा त्रागा विठ्ठलापुढे मांडला.तर प्रसाद कुलकर्णी यांनी, 'धमक्यांनी वेळोवेळी मज कणखर केले आहे 

 मरणाची कसली भीती ? मी जगणे जाळत होतो ' अशा शब्दात तत्वनिष्ठ कार्यकर्त्याची भूमिका स्पष्ट केली.या मुशायऱ्यातील सर्व गझलकारांनी आपल्या विविध ढंगाच्या उत्तमोत्तम गझला सादर केल्या. ज्येष्ठ गझलकार खलील मोमीन यांनी समारोप केला.नागेशकर भवन मध्ये झालेल्या या  मुशायऱ्याला सुभाष नागेशकर, वसुधा कुलकर्णी, संजय पाठक, विश्वजित साखरे यांच्यासह रसिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post