प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कल्याण : एका महिलेशी अश्लील संभाषण करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला महिलांनी कल्याणमध्ये चांगलाच चोप देत अद्दल घडवली आहे. शिवाजी आव्हाड असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आलंय. या मारहाणाची व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
नक्की काय झालं?
या अधिकाऱ्याची महिलेसोबत सोशल मीडियाद्वारे ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. पीडित महिला ही बदलापुरात राहत असून ती सामाजिक संस्थेत कार्यरत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याने या महिलेला स्वत:च्या सामजिक संस्थेची नोंदणी करुन देतो, असं सांगून जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. हा अधिकारी इतक्यावरच थांबला नाही. तर पीडितेच्या मैत्रिणीला थेट नगरसेवक करतो, असं म्हणत तिच्यासोबतही अश्लील संभाषण केलं.
त्यानंतर या अधिकाऱ्याने महिलांना कल्याणमधील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. ठरल्यानुसार सर्व झालं. या दोन्ही महिला इतर आणखी महिलांसह ठरलेल्या हॉटेलवर गेल्या. त्याच हॉटेलमध्ये या अधिकाऱ्याला चांगला चोपर दिला. या चोप दिल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
महिलांनी या अधिकाऱ्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी फक्त तक्रार दाखल केली. त्यानंतर पीडित महिला जिथे राहते, त्या भागात गुन्हा दाखल करा, असा सल्ला दिला गेला. त्यामुळे महिलांकडून पोलिसांच्या भूमिकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. मात्र महिलांनी या अधिकाऱ्याला चोप देत चांगलीच अद्दल घडवली.
राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर
ठाण्यात पालिका अतिरिक्त आयुक्तांची फेरीवाल्याने बोट छाटली. त्यांनतर राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या अनेक घटना घडल्यात. अवघ्या साडे 13 वर्षांच्या मुलीवर तब्बल 14 जणांना बलात्कार केला. रिक्षात 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला गेला. मुंबईतील साकीनाक्यात 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन गुप्तांगावर वार केले गेले. या पीडितेचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था नावाचा काही प्रकार उरलाय की नाही, असा सवाल उपस्थित केला जातोय.