प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर ता. २३ ,स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, श्रम हीच आमची पूजा आणि श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण हे आमचे घोषवाक्य असे म्हणणारे आणि ते कृतीत उतरवणारे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील आकाशाच्या उंचीचे व जागतीक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व होते.कर्मवीरांनी आपले शैक्षणिक तत्त्वज्ञान महाराष्ट्रामध्ये शब्दश: रुजवले. महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी पासून गेल्या शंभर वर्षांमध्ये महाराष्ट्राचा जो शैक्षणिक विकास झाला त्यामध्ये कर्मवीर अण्णांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे लागेल. आज कर्मवीरांचा व्यापक शैक्षणिक विचार पुसून टाकण्याचे काम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० द्वारे होत आहे.अशावेळी कर्मवीरांच्या सार्वकालिक महत्वाच्या असणाऱ्या शैक्षणिक विचारांचा जागर करणे व धोरणकर्त्यांनी ते राबवावे यासाठी लोकदबाव तयार करणे महत्वाचे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कॉलेज, कोल्हापूरच्या वतीने आयोजित व्याख्यानात " कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान " या विषयावर बोलत होते. कर्मवीर अण्णांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने हे ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ.एम.बी.शेख होते.रयतच्या जनरल बॉडी सदस्या मा.सरोजताई उर्फ माई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्राचार्य डॉ.आर.एस.डूबल यांनी स्वागत,प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले ,कर्मवीरअण्णांनी स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मांडली.पण आज त्याला तडे दिले जात आहेत. शिक्षणाने केवळ सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत नागरिक घडला पाहिजे ही त्यांची धारणा होती.शिक्षणातून सामाजिक विकास घडविण्यावर त्यांचा भर होता. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे प्रशिक्षित शिक्षक ही कर्मवीरांची भूमिका होती. म्हणूनच त्यांनी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात १९१९ ला स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत शाळा-महाविद्यालयासह अध्यापक महाविद्यालय, ट्रेनिंग कॉलेज, कन्झ्युमर स्टोअर्स, सेवक बँक असे पूरक उद्योगही सुरू केले.पण आज शिक्षण ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे नेले जात आहे.राज्यघटनेच्या सरनाम्याच्या चौकटीतून शिक्षण गायब करून मूलभूत कर्तव्यापासून राज्यकर्ते मुक्ती मिळवू पहात आहेत.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ' कर्मवीरांचे जीवन हेच किर्तीस्तंभ आहे ' असे म्हटले होते. आज या किर्तीस्तंभाचे शैक्षणिक तत्वज्ञान पुन्हा पुन्हा आग्रहपूर्वक मांडण्याची व ते कृतीत आणण्याचा आग्रह धरण्याची गरज आहे.आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात प्रसाद कुलकर्णी यांनी या कर्मवीरअण्णांचे शिक्षण विचार आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेची नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणापर्यंतची सविस्तर मांडणी केली.
डॉ.एम.ए.शेख अध्यक्षीय मनोगतात म्हणाले,रयत शिक्षण संस्था कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक तत्वांचा अंगीकार करून वाटचाल करत आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे बहुजनांना संधी देणारे आणि रोजगार निर्मितीसह सर्व क्षेत्रात देशाला पुढे घेऊन जाणारे हवे.ऑनलाईन शिक्षणापासून शाळा- महाविद्यालये बंद होण्यापर्यन्त अनेक गंभीर प्रश्न आज उभे राहिले आहेत.कर्मवीर अण्णांच्या शिक्षण विचारांच्या स्वीकारातूनच हे प्रश्न सुटू शकतील.आभार प्रा.डॉ.बी.एस.पुणतांबेकर यांनी मानले.प्रा.ज्योती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.या ऑनलाईन व्याख्यानास प्राध्यापक व विद्यार्थी - विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.