ज्येष्ठ वृत्तपत्र पत्रलेखिका सुनंदा चौगुले यांना आदरांजली

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या उपाध्यक्षा आणि ज्येष्ठ वृत्तपत्र पत्रलेखिका सुनंदा महावीर चौगुले शुक्रवार ता. ३ सप्टेंबर २१ रोजी वयाच्या सहाष्ठाव्या वर्षी हृदयविकाराने कालवश झाल्या.वृत्तपत्र लेखक संघटनेच्या बैठकीत आणि वर्धापनदिनाच्या वार्षिक समारंभात त्यांचा सहभाग नेहमीच उस्फुर्त आणि लक्षणीय असायचा. गेली तीस - पस्तीस वर्षे  विविध विषयांवर वृत्तपत्रात पत्रलेखन करत होत्या. प्रामुख्याने नागरी सोयी सुविधांबाबत त्यांनी सातत्याने लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला.कथा व कविता लेखनाचीही त्यांना आवड होती. त्यांची शेकडो पत्रे अनेक कथा - कविता प्रकाशित झाल्या होत्या. सामाजिक कार्याचीही आवड त्यांनी जोपासली होती. स्वदेशी महिला बचत गट,महिला महासंघ आदींच्या उपक्रमात त्या सहभागी असत. सामाजिक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असे.फॅशन डिझायनिंग पासून फोटो लॅमीनेशनपर्यन्त अनेक कला त्यांना अवगत होत्या.तसेच दुग्धव्यवसायापासून छोट्याशा हॉटेल व्यवसायापर्यन्तचे उद्योग जोपासत त्यांनी कुटुंबाच्या उभारणीत मोठे सहकार्य केले होते.त्यांच्या पत्रलेखन,साहित्य लेखन, सामाजिक कामाला त्यांचे पती,मुलगा व मुलींचा सातत्यपूर्ण पाठिंबा होता. त्यांना ज्येष्ठ महिला पत्रलेखिका म्हणून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ, इचलकरंजी रोटरी क्लब यासह अनेक संस्थानी पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांनी अनेकदा रक्तदानही केले होते.' घरची सर्व जबाबदारी पार पाडून हसतमुखाने सामाजिक कार्य करायला मला आवडते ' असे त्या नेहमी म्हणत. वृत्तपत्र पत्रलेखनाच्या क्षेत्रात साडेतीन दशकांपूर्वी फार कमी महिला होत्या.त्यामुळे सुनंदाताईंचे पत्रलेखन फार महत्वाचे ठरते.इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेच्या त्या स्थापनेपासूनच्या आमच्या सक्रिय सहकारी होत्या.समाजवादी प्रबोधिनीत  वृत्तपत्र लेखक संघाच्या मासिक बैठकीवेळी आम्हा सर्व सदस्यांसाठी भडंगापासून भजीपर्यन्त अनेकदा काही ना काही खायला घेऊन येणाऱ्या आणि प्रत्येक सणाला सकाळी आवर्जून फोन करून शुभेच्छा देणाऱ्या सुनंदाताई माणूस म्हणूनही फार मोठ्या होत्या. त्यांचे असे अचानक जाणे ही मोठी सामाजिक हानी आहे.त्यांच्या विनम्र अभिवादन.


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Post a Comment

Previous Post Next Post