नगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षक दिन साजरा
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : सर्वच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मौलिक योगदानामुळे नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांना पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे. यशाचा हा आलेख असाच उंचावत न्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी केले. नगरपरिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
नगरपरिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने येथील राजर्षि शाहू हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा सौ. स्वामी बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लेखिका श्रीमती वैशाली नायकवडे उपस्थित होत्या.
प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रशासन अधिकारी सौ. नम्रता गुरसाळे यांनी केले. शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांनी, बदलत्या काळानुरुप विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी नगरपालिकेकडून सर्वच विद्यार्थी-विद्यार्थीनींना टॅब देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुण्या लेखिका वैशाली नायकवडे यांनी, प्राथमिक स्तरावर बालकांना घडवायचे अत्यंत जिकिरीचे काम शिक्षक मनापासून करत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना भावी पिढी अधिक्ष सक्षम कशी होईल याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले.
सूत्रसंचालन पी. ए.पाटील यांनी केले. आभार रविंद्र मोरे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र घोडके, शिक्षक संघाचे अध्यक्ष किरण दिवटे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष संजय आवळे, उर्दू शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गौस पटेल, मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष मोहन वाघमारे, अकौंटंट विजय कोळी, क्लार्क बाबाजान जमादार, अलका कोरे आदींसह सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधत सर्वच शाळांना उपयोगी पडेल अशा बहुउपयोगी साहित्याचा एक संच नगरपरिषद शिक्षण विभागकडुन प्रत्येक शाळेला देण्यात आला.