एक पत्रकार म्हणून मला भावलेले राजसाहेब..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कबनूर ता. १२/०९/२०२१
पत्रकारीतेमधील माझे एक मार्गदर्शक, माझे गुरु, खोचक आणि वेचक बातम्या कशा लिहायच्या, एखाद्या शब्दाचा कुठे आणि कसा चपलख वापर करायचा, बातमी आल्यानंतर ती " त्या " माणसाच्या थेट काळजा पर्यंत कशी पोहचेल, त्या बातमीमुळे नेमके कोणाला आणि कसे घायाळ करायचे ? शोधपत्रकारीतां कशी करायची? याचे नेमके धडे मला सुरवातीच्या काळात ज्यांच्यामुळे मिळाले ते आमचे परममित्र आदरणीय शशिकांत राज साहेब यांच्यावर नियतीने ११/९/२१ रोजी घाला घातला व आमच्या पासुन हिरावून नेले. त्यामुळे आमच्या पत्रकार संघात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मी ज्यावेळी २००५ साली प्रथम कबनूरचा पत्रकार झालो त्यावेळी मला बातम्या लिहता येत नव्हत्या. ग्रामपंचायत, प्रभाग, सदस्य, जि. प. सदस्य व ता. प. सदस्य, आरक्षण याचा कांही गंध नव्हता. त्यावेळी मी राज साहेबांना भेटलो. त्यांनी मला एका कागदावर आकृत्या काढून त्याची सर्व सविस्तर माहिती दिली. तेथूनपुढे त्यांच्यात व माझ्यात गुरु-शिष्य व मित्राचे नाते निर्माण झाले. मला ज्यांनी पत्रकारीतेत आणले ते माझे प्रथम गुरु आदरणीय कै. कुमार गारगोटे यांच्यानंतर राजकीय बातम्या कशा लिहायच्या याचे ज्ञान राज साहेबांनी मला दिले. मी राजकीय बातमी लिहली की ती प्रथम राज साहेबांना दाखवून मगच ती फायनल करीत होतो. राजसाहेबांनी एखादा शब्द घालायला सांगितले की मी कचरत होतो. त्यांच्या "त्या" शब्दाला बरीच धार असायची. त्यांच्या एका शब्दाने बातमीचे रुपच पालटायचे. पण मलाच भिती वाटायची. पण राजसाहेब धीर द्यायचे. " लोहा गरम है, मार दो हातोडा " असे ते म्हणायचे. त्यांनी राजकारण कोळून प्यायले होते. त्यामुळे राजकीय बातम्या, विश्लेषणात त्यांचा कोणी हात धरु शकत नव्हते. निवडणूका आल्या की त्यांच्या दैनिकाचे मालक खास बोलावून घेऊन त्यांना राजकीय वार्तापत्र लिहण्यास सांगत होते. यावरुन त्यांचा राजकीय बातम्या लिहण्यातील हातखंडा दिसुन येत होता.
त्यांच्या सहवासात असल्याने पत्रकारीता सोपी गेली असे म्हंटले तर ते वावगे होणार नाही. माझी बातमी त्यांनी वाचली व त्यांना आवडली की ते लागलीच फोनवरुन माझे कौतुक करायचे. पत्रकारीतेत आम्हा सर्वच पत्रकारांना संकटकाळी धीर देऊन ते आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहायचे व योग्य ते मार्गदर्शन करायचे. त्यामुळे पुढे आमची पत्रकारीता बहरत गेली. पण त्यांनी त्याचा कधीच द्वेष केला नाही उलट मला शाबासकीच दिली. " सुरेशराव मस्तच " असे त्यांनी म्हंटले की मला पण आणखी जोर यायचा.
पत्रकारीतेत त्यांचा एक वेगळाच रुबाब होता. त्यांनी या क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता.गावात त्यांची एक वचक निर्माण झाली होती. गावामध्ये "पत्रकार म्हणजे शशिकांत राज " असे एक समीकरण बनले होते. अनेक लोक त्यांना दबकून असायचे. त्यांच्या तोंडावर त्यांना कोणी बोलण्याचे धाडस करीत नव्हते. पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजातील अनेकांची कामे करुन दिलीत. त्यानी गावातील अनेक सामाजिक प्रश्नांना व नागरी समस्यांना प्राधान्याने वाचा फोडली.ते भाजपात गेल्यावर त्यांचेवर भाजपाचे कोल्हापूर जिल्हा प्रेस मिडीयाची जबाबदारी सोपविली होती. ती त्यांच्या पत्रकारीतेच्या यशाची पोहोच पावती म्हणावी लागेल. जलस्वराज्य प्रकल्पाच्या माध्यमातून कबनूर गांवचा महत्वाचा पाणीप्रश्न सोडवण्यात त्यांचा सहभाग सर्वात मोठा होता हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज भासणार नाही. त्यांना दलितमित्र, समाजभुषण, आदर्श पत्रकार तसेच शासनाचेही अनेक पुरस्कार मिळाले. कांही मानाची पदेही त्यांनी भुषवली.
पत्रकारीतेबरोबरच त्यांचा राजकारणात दबदबा निर्माण झाला होता. राजकारणाची त्यांना आवड होती. राजकीय डावपेच व गनिमी कावा करण्यात ते पटाईत होते. पण राजकारणात त्यांची तेज बुध्दीमत्ता व प्रामाणिकपणा आड आला. त्यामुळे कदाचित ते राजकारणात मागे राहिले असावेत. राजकारणात जवळच्या लोकांवर त्यांनी ठेवलेला विश्वासच त्यांना नडल्याचे त्यांनी एकदा खाजगीत बोलताना सांगितले होते. जर त्यांना राजकारणात एखादे पद मिळाले तर ते वरचढ होतील व त्यांची राजकीय दुकाने बंद पडतील याची भिती अनेकांना वाटायची आसे ते म्हणायचे. पण अनेकांना राजकारणात मोठे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी कधी स्वतःचा व कुटुंबियांचा फायदा करुन घेतला नाही. ते शेवट पर्यंत एक सामान्य माणुस म्हणुन जगले.
राज साहेबांची वाणी मधुर होती. महान असो वा लहान ते सर्वाना अदबीने बोलवायचे. माझ्या आयुष्यात त्यांनी मला "सुरेश" किंवा "कुंभार" या नावानी एकेरी हाक मारल्याचे मी ऐकले नाही. ते मला नेहमी "सुरेशराव" म्हणायचे. तसेच प्रत्येकाचे नावापुढे ते नेहमी राव, साहेब, सर, भैय्या, भाई, बाबा (जग्गूबाबा) अशी ऊपाधी लावूनच बोलवायचे. ग्रामपंचायतीचा कामगार असो, मजूर असो, सामान्य माणुस असो वा एखादा तरुण त्यांच्या पेक्षा लहान वयाचा असो, प्रत्येकांना ते तसे बोलवायचे. प्रत्येकाला ते रिस्पेक्ट द्यायचे. त्यामुळे लोक त्यांचा मनापासून आदर करायचे. तसेच ते विनोदी स्वभावाचे होते. पत्रकारीतेचा गुरुर त्यांनी कधी केला नाही.
आमच्या पत्रकार संघाचे ते मुख्य व अविभाज्य घटक होते. ते शेवट पर्यंत आमच्या पत्रकार संघात होते. त्यांना आम्ही कधीही विसरले नाही. येथूनपुढेही विसरणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आम्हाला नेहमीच असायची. त्यांची उणीव नेहमीच आम्हा पत्रकारांना भासेल. राज साहेब आजारी पडल्यानंतर कांही काळ त्यांनी पत्रकारीता केली नाही. मात्र त्यांचे पत्रकारीतेमधील उत्तुंग कार्य आम्हाला दीपस्तंभा सारखे नेहमीच मार्गदर्शन करीत राहील.
अशा या मनमिळाऊ, विनोदी, देधडक - बेधडक व रणझुंझार व्यक्तिमत्वाची एक्झिट ही वयाच्या ५५ व्या वर्षीच झाली हे दुर्दैव म्हणावे लागेल. राजसाहेबांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता कुठे सुखाची चिन्हे दिसू लागली होती. पण क्रुर नियतेने त्यांच्यावर घाला घातला आणि होत्याचे नव्हते झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज साहेबांचा मृत्यू मनाला चटका लावून जाणारा ठरला.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हिच प्रार्थना... त्यांना आमची भावपूर्ण आदरांजली......! कबनूर मध्ये ज्या ज्यावेळी पत्रकारीतेची चर्चा होईल त्या त्यावेळी " राजसाहेब " तुमचीच पहिला आठवण येईल. साहेब तुमच्या पत्रकारीतेला माझा सलाम..!