आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही....नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी : शहरातील डेंग्यु आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करुन साथीच्या आजारावर नियंत्रण आणावे. प्रत्येक भागात घंटागाडी, दैनंदिन कचरा उठाव आदीमध्ये नियमितता ठेवावी. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही, अशा सक्त सूचना नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या बैठकीत बोलताना केल्या.

मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्युचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर भागाभागात दैनंदिन कचरा उठाव होत नसल्याबद्दल तसेच घंटागाडी वेळेत येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांनी बुधवारी आपल्या दालनात आरोग्य विभागातील सर्वच अधिकारी, स्वच्छता निरिक्षक व कर्मचार्‍यांची तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी आवश्यक त्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या.

त्यानंतर नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी, सध्या सणासुदीचे दिवस असून आधीच कोरोना, पुर व  महामारी संकटाचा सामना केला जात असतानाच पावसाळ्यामुळे साथीचे आजार पसरु लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने  स्वच्छतेच्या कामात गय करु नये. प्रत्येक भागात सारण गटारींची स्वच्छता करण्यात यावी. ज्या भागात डेंग्यु अथवा तत्सम आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागासह सर्वच ठिकाणी औषध व धूर फवारणीसह स्वच्छता मोहिम राबवावी. तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. प्रत्येक भागात दैनंदिन कचरा उठाव करण्यासह घंटागाडी नियमित व वेळेत फिरवून घरातील कचरा स्विकारावा आदी सूचना केल्या. आरोग्याच्या कामासंदर्भात पुन्हा तक्रारी प्राप्त होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घ्यावी, असा सूचना केल्या.

या बैठकीत आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक किसन शिदे आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार,आरोग्य विभाग प्रमुख विश्‍वास हेगडे मुख्य स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत चव्हाण स्वच्छता निरीक्षक विजय पाटील आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post