वृत्तपत्रसृष्टीत अगदी पहिल्यापासून महत्वाचा घटक म्हणून वृत्तपत्र पत्रलेखकाचे महत्व मोठे आहे ....प्रा.डॉ.निशा मुडे - पवार



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी ता. २४ ,माध्यमात होणारे बदल अपरिहार्य आहेत. माध्यमांचे स्वरूप बदलतच राहणार मात्र  समाजाला पुढे नेणारी मानवी व घटनात्मक सामाजिक मूल्ये बदलत नसतात.ती मुल्ये वर्तमानात प्रस्थापित करून भविष्याकडे सोपविण्याचे आणि पुढची पिढी समाजीकदृष्टया जागृत बनविण्याचे काम वृत्तपत्र पत्रलेखक करीत असतात.पत्रकारांप्रमाणेच वृत्तपत्र पत्रलेखकही समाजातील इष्ट - अनिष्टतेची दखल घेत असतात.त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत अगदी पहिल्यापासून महत्वाचा घटक म्हणून वृत्तपत्र पत्रलेखकाचे महत्व मोठे आहे असे मत शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र ,संवादशास्त्र आणि मास मीडिया विभागप्रमुख प्रा.डॉ.निशा मुडे - पवार यांनी व्यक्त केले. त्या इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या चोविसाव्या वर्धापन दिनी आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. ' वृत्तपत्र पत्रलेखक व माध्यमातील बदल ' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी इचलकरंजीच्या नगराध्यक्ष ऍड.अलकाताई स्वामी होत्या. अभिजीत पटवा यांनी स्वागत केले. पांडुरंग पिसे यांनी प्रस्ताविक केले व त्यातून संघटनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानापूर्वी क्रांतीविरांगना हौसाताई पाटील आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या उपाध्यक्षा सुनंदा चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली.

 प्रा.डॉ.निशा मुडे - पवार म्हणाल्या, वास्तविक प्रत्येक वृत्तपत्र वाचक हा व्यक्त होऊ इच्छित असतो.पण तो ते शब्दबद्ध करू शकत नाही. त्याच्या भावना भवतालात घडत असलेल्या बदलाचा कानोसा घेऊन वृत्तपत्र पत्रलेखक शब्दबद्ध करत असतो. आज सोशल मिडीया मुळे व्यक्त होण्याला मोठी संधी, मोठा अवकाश प्राप्त झाला आहे. मात्र त्याच वेळी ते व्यक्त होणे सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या निकोप असणे गरजेचे असते. वृत्तपत्र पत्रलेखक ती निकोप दृष्टी जपत असतो.रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणारा इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघ तो निकोप विचार संघटितपणे पुढे नेत आहे ही आनंदाची बाब आहे.

त्या पुढे म्हणाल्या,आज माध्यमात होत असलेले बदल काही प्रमाणात एकांगीपणे होताना दिसत असले तरी कोणताही एकांगीपणा हा तात्कालिक असतो हे ऐतिहासिक सत्य आहे. प्रा. डॉ.निशा मुडे -पवार यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक उदाहरणे दिली. माध्यमातील बदलांचे संदर्भ देऊन या विषयाची अतिशय सखोल मांडणी केली. तसेच श्रोत्यांच्या शंकांचे निरसनही केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना नगराध्यक्षा ऍड.अलकाताई स्वामी यांनी इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्या गेल्या दोन तपातील वाटचालीचे कौतुक केले.पत्रलेखक ज्या पद्धतीने माध्यमातून व्यक्त होत असतात त्यातून सर्व व्यवस्था सुरळीतपणे काम करण्यास मदत होते.त्यामुळे वृत्तपत्र पत्रलेखक हे मोठे समाजकार्य करत असतात असे म्हणावे लागेल.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित कोंडेकर, महेंद्र जाधव, दीपक पंडित ,नारायण गुरबे,रमेश सुतार ,राकेश शेटके ,दिगंबर उकिरडे,महादेव मिणची,बाळासो नरशेट्टी आदींनी परिश्रम घेतले. कोरोनाचे नियम पाळून झालेल्या या कार्यक्रमाला जिज्ञासू नागरिक, पत्रकार,माध्यमकर्मी तसेच विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.मनोहर जोशी यांनी आभार मानले

फोटो : प्रा. निशा मुडे - पवार यांचे स्वागत करताना पांडुरंग पिसे मंचावर नगराध्यक्षा ऍड.अलकाताई स्वामी आणि प्रसाद कुलकर्णी

Post a Comment

Previous Post Next Post