प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हुपरी ता.२८ कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयतमाऊली लक्ष्मीबाई यांनी तन,मन,धन अर्पून रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली. 'सारे अनर्थ एका विद्येने केले ' या महात्मा फुल्यांच्या अखंडाची प्रेरणा घेऊन शैक्षणिक क्षेत्रातील कृतिशीलता या दाम्पत्याने अखंडपणे जपली. अडी - अडचणी सोसत,आव्हानांना पेलत ध्येयपथावर सक्रिय वाटचाल करीत राहिले तरच परिवर्तन होऊ शकते असा जीवनसंदेश त्यांनी दिला.आज शिक्षण क्षेत्रावर आलेले विषमतेचे अरिष्ट थोपवायचे असेल तर कर्मवीरांची विचारधारा घेऊन शिक्षण क्षेत्राची मांडणी करावी लागेल असे मत समाजवादी प्रबिधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते हुपरी येथील रयत शिक्षण संस्था संकुलाच्या पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य मा. सरोजताई पाटील उर्फ माई होत्या.प्राचार्या डॉ.पी.बी.पाटील, प्राचार्य बी. आर.भिसे, मुख्याध्यापिका यू.एस.नकाते यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन चंद्राबाई -शांताप्पा शेंडूरे कॉलेज, शांता -रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल,पारिसाण्णा इंग्रोळे ज्युनियर कॉलेज, लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूल यांनी संयुक्तपणे केले होते.स्वागत व प्रास्ताविक प्राचार्या डॉ.पी.बी.पाटील यांनी केले.प्रा.डॉ.बाळकृष्ण जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले , शिक्षण धोरण हे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे असले पाहिजे.पण आज ते अंधुकतेकडून गर्द अंधाराकडे नेले जात आहे. ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे शिक्षण जाणे योग्य नाही. शंभर वर्षांपूर्वी कर्मवीरअण्णांनी स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य या शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या चतु:सूत्रीवर भर दिला. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात १९१९ ला स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत शाळा-महाविद्यालयासह अध्यापक महाविद्यालय, ट्रेनिंग कॉलेज, कन्झ्युमर स्टोअर्स, सेवक बँक असे पूरक उद्योगही सुरू केले.राज्यघटनेच्या सरनाम्याच्या चौकटीतून शिक्षण गायब करून मूलभूत कर्तव्यापासून राज्यकर्ते दूर जात आहेत.त्याविरोधी आवाज उठवला पाहिजे. आपल्या तासभराच्या भाषणात त्यांनी कर्मवीरांचा जीवनसंदेश व आजचे शैक्षणिक वर्तमान याचे सविस्तर विवेचन केले.
अध्यक्षस्थाना वरून बोलताना मा.सरोजताई पाटील उर्फ माई म्हणाल्या,कर्मवीर अण्णांनी वाड्या ,वस्त्या,डोंगर, दऱ्या अनवाणी पायाने तुडवत शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात पोहोचवली.शिक्षणातून सर्वांगीण विकासाची संधी मिळू शकते या धारणेतून ते कार्यरत राहिले.आज नव्या शैक्षणीक धोरणात अनेक धोके लपलेले आहेत ते समजून घेऊन कर्मवीर अण्णांचे विचार कृतीत आणण्यासाठी आपण कटिबद्ध झाले पाहिजे.या कार्यक्रमाला रयत संकुलातील शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. मुख्याध्यापिका यू.एस.नकाते यांनी आभार मानले.प्रा.संध्या माने यांनी सूत्रसंचालन केले.