प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमानंतर सुरू झालेल्या मॉल्सला अनेक ठिकाणी पुन्हा टाळे ठोकण्यात आले आहे. शासनाने घालून दिलेल्या अटींची पूर्तीची मॉल्समालक आणि व्यवस्थापकांना करणे अशक्य झाले आहे 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही अटींसह मॉल उघडण्याची परवानगी दिली होती. ज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे 2 डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देणे बंधनकारक होते. मात्र , मॉल्समध्ये काम करणारे 90 टक्के कर्मचारी हे 45 वर्षे वयोगटाखालील असल्याने मॉल चालकांना या अटीची पूर्तता करणं कठीण होत. त्यामुळे अनेक मॉल चालकांनी मॉल बंद ठेवण्याची वेळ आली, या निर्णयामुळे हजारो व्यावसायिकांसह लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात आले आहे.
शासनाच्या नव्या निर्देशांनुसार लसींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, शिवाय दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले असावे अशी अट घालण्यात आली होती, 15 ऑगस्टनंतर मुंबईतील जवळपास 20 मॉल्स सुरू झाले होते. मात्र शासनाची अट पूर्ण करता येत नसल्याने बहुतांश मॉल पुन्हा बंद करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान शासनाने घालून दिलेल्या नियमांचा पुनर्विचार करावा अशी मागणी मॉल चालकांनी केली आहे. मागील दीड वर्षांपासून व्यवसाय बंद असल्याने केवळ मॉल चालकांचेच नाही तर मॉलमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांचे भवितव्य धोक्यात आल्याचे मॉल चालक आणि व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.