धनंजय हलकर (शिंदे)
सांगली - महापुरात बुडालेला ऊस जळाला, भाजीपाला कुजला. शेतकरी देशोधडीला लागला. सव्वा महिना झाला तरी एक रुपायाची मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकार जागे होणार का? पुढील पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर शेतकरी पत्नी, मुले, जनावरांसह रस्त्यावर उतरतील, असा इशारा सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पै.पृथ्वीराज पवार यांनी दिली.
येथील स्टेशन चौकातून काँग्रेस भवनपर्यंत जळालेला ऊस, कुजलेला भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हवेत घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत द्यावी, अशी टीका करण्यात आली. पै.पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘सरकार निव्वळ नव्या घोषणांचे रतीब घालत आहे. शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ६५ रुपयांची मदत जाहीर करून थट्टा केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांचा रोष पाहून २०१९ प्रमाणे मदत जाहीर केली. प्रत्यक्ष एक रुपया मिळालेला नाही. आधीच कोरोनामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. नागठाणेतील तरुण शेतकरी, अंकलखोपला दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारच याला जबाबदार आहे. मुंबई, पुणे, हैद्राबाद, दिल्लीसारख्या बाजारपेठांत भाजीपाला गेला नाही. महापुराने तर सगळे पीक कुजून गेले आहे. शेतकरी मोडून पडला आहे.’’
ते म्हणाले, ‘‘पदाधिकारी निवडीत व्यस्त काँग्रेस नेत्यांनी हा आक्रोश वडेट्टीवारांपर्यंत पोहचवावा. त्यांनी पुढील १५ दिवसांत मदत दिली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. १५ सप्टेंबरनंतर कोणत्याही क्षणी हजारो लोक रस्त्यावर उतरतील. त्याचे गंभीर परिणाम झाल्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.’’
महावीर चव्हाण, दादा तामगावे, नातगोंड पाटील, माणिक आवटी, शितल पाटील, बंडु शेटे, सतीश पवार , सौ. रेखा पाटील, अभीमनयु भोसले, रविंद्र वादवणे, गोपाल पवार, विशाल पवार , आदी उपस्थित होते.